लक्झरी कार निर्मात्या मर्सिडीज बेंझने उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या भीषण अपघाताचा अंतरिम अहवाल पालघर पोलिसांकडे सुपूर्द केला आहे. या अहवालानुसार, अपघात होण्याच्या पाच सेंकदआधी गाडीचे ब्रेक लावण्यात आले होते. मर्सिडीज- बेंझच्या तज्ज्ञांचे पथक कारच्या तपासणीसाठी सोमवारी हाॅंगकाॅंगवरुन मुंबईला येणार आहे. कंपनीने कारमधील चिप विश्लेषणासाठी जर्मनीला पाठवली आहे. तसेच, आरटीओनेही आपला अहवाल पालघर पोलिसांना दिला आहे.
12 सप्टेंबर रोजी ही टीम अपघाताचे कारण जाणून घेण्यासाठी कारची तपासणी करु शकते. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातापूर्वी मिस्त्री यांची कार ताशी 100 किमी वेगाने जात होती. डाॅ. अनाहिता पांडोळे यांनी डिव्हायडरला धडकण्याच्या पाच सेकंदापूर्वी ब्रेक लावला. ब्रेक लावल्यानंतर कारचा वेग 89 किमीपर्यंत कमी झाला. यादरम्यान, कार दुभाजकाला धडकली.
अपघातात कारच्या 4 एअरबॅग्स उघडल्या
एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी चार एअरबॅग्स उघडल्या होत्या. यामध्ये चालक डाॅ. अनाहिता यांना तीन एअरबॅग्सचे संरक्षण मिळाले. समोरच्या दुस-या सीटवर बसलेल्या दारियसच्या समोरची एअरबॅग्सही उघडली. डाॅक्टर आणि तिचा पती दारियस रुग्णालयात दाखल आहेत. टाटा समूहाचे माजी प्रमुख मिस्त्री आणि कारच्या मागील सीटवर बसलेले जहांगीर पांडोळे यांचा मृत्यू झाला.
( हेही वाचा: Yakub Memon Controversy: दोन वर्षांपासून तक्रारीवर कारवाई नाही, दहशतवादी मेमनला कोणाचे वरदान? )
मर्सिडीज बेंझचे काय म्हणणे आहे ?
मर्सिडीज बेंझने आपल्या निवेदनात म्हटले की, आम्ही ग्राहकांच्या गोपनीयतेचा आदर करतो, त्यामुळे आम्ही आमचे निष्कर्ष केवळ संबंधित तपास अधिका-यांना देऊ. याशिवाय आम्ही त्यांच्याशी सहकार्य करत आहोत आणि पुढे आवश्यकतेनुसार माहिती आणि स्पष्टीकरण थेट अधिका-यांना पाठवले जाईल.
Join Our WhatsApp Community