मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, वाहतूक ठप्प

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सोमवारी एक भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. महामार्गावर प्रोपोलिन गँस टँकर उलटल्यामुळे वाहतुकीची फार मोठी कोंडी झाली आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

तीन जणांचा मृत्यू

सोमवारी दुपारी 12च्या सुमारास पुण्याहून मुंबईकडे जाणा-या प्रोपोलिन गॅस टँकरचा भीषण अपघात झाला. मुंबई-पुणे महामार्गावरील खोपोली एक्झिट जवळील उतारावर चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्यामुळे टँकर पुणे लेनवर येऊन उलटला. या टँकरला मागून येणा-या तीन गाड्या धडकल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. दरम्यान या अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवण्यात आली आहे.

(हेही वाचाः NIA चा दणका! मलिकांचा साथीदार आणि माहीम दर्ग्याचे विश्वस्त खंडवाणींची मालमत्ता जप्त)

वाहतुकीची कोंडी

या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलिस ठाण्याचे पथक दुर्घटनास्थळी दाखल झाले आहे. बोरघाट पोलिस यंत्रणा, देवदूत यंत्रणा, लोकमान्य हॉस्पिटल, महाराष्ट्र सुरक्षा बल, डेल्टा फोर्स या यंत्रणा अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून आल्या आहेत. सुदैवाने टँकरमधील गॅसची गळती न झाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. अपघातामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. टँकर हटवून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत.

या अपघातात टँकरचा चालक गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त दोन गाड्या या क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here