Cyrus Mistry Death : टाटा समूहाच्या सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू

184

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि शापूरजी-पालनजी समूहाचे वारसदार सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाला. पालघर जिल्हा अधीक्षकांनी ही माहिती दिली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पालघरच्या चारोटी परिसरात त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. मुंबई-अहमदाबाद मार्गावर सूर्या नदीवरील पुलावर सायरस मिस्त्री यांची मर्सिडीज कार दुभाजकाला धडकली. या अपघातामध्ये मिस्त्री यांच्या गाडीचा चालक गंभीर जखमी झाला आहे. तर सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. चालकाचे गाडीवर नियंत्रण न राहिल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात घडला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच सायरस मिस्त्री यांचे निधन झाले होते. त्यांचे पार्थिव आता टाटा रुग्णालयातून गुजरातमधील त्यांच्या घरी नेले जाणार आहे.

कोण होते सायरस मिस्त्री?

सायरस मिस्त्री यांची ऑक्टोबर २०१६मध्ये टाटा सन्सच्या चेअरमनपदावरून हकालपट्टी केली होती. त्यानंतर दोन महिन्यांनी मिस्त्री यांच्यावतीने त्याच्या परिवारातील ‘सायरस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘स्टर्लिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्प’ने ‘टाटा सन्स’च्या निर्णयाविरुद्ध ‘एनसीएलटी’च्या मुंबई खंडपीठात दावा दाखल केला. या कंपन्यांच्या मते ‘टाटा सन्स’च्या चेअरमनपदावरून मिस्त्री यांची करण्यात आलेली हकालपट्टी कंपनी कायद्याला धरून नव्हती. त्यांनी ‘टाटा सन्स’च्या व्यवस्थापनावर आणि रतन टाटा यांच्यावरही आरोप केले. मात्र, जुलै २०१८मध्ये ‘एनसीएलटी’ने त्यांचा दावा रद्दबातल ठरवला. त्यानंतर मिस्त्री यांनी ‘एनसीएलएटी’मध्ये दावा दाखल केला. ‘एनसीएलटी’ने ९ जुलै २०१८ रोजी दिलेल्या निर्णयात ‘टाटा सन्स’च्या संचालक मंडळाला मिस्त्री यांना चेअरमन पदावरून हटविण्याचे अधिकार असल्याचे म्हटले होते. कंपनीच्या समभागधारकांचा आणि संचालक मंडळाचा त्यांच्यावरील विश्वास डळमळीत झाल्यामुळे त्यांना पदावरून हटविण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले. २०१२मध्ये रतन टाटा यांनी निवृत्ती स्वीकारल्यानंतर सायरस मिस्त्री टाटा सन्सच्या सहावे चेअरमनपदी नियुक्त झाले होते.

(हेही वाचा भारताची आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल! लवकर जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनणार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.