पहिल्या दिवसाच्या कोरोना ‘बूस्टर’ डोसचे बघा किती लाभार्थी!

कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी सुरु झालेल्या बूस्टर डोसला देशभरातून सोमवारी सुरुवात झाली. राज्यात ४९ हजार ५२४ लाभार्थींनी बूस्टर डोस घेतल्याची माहिती आरोग्यविभागाने रात्री उशिराने दिली. आरोग्यसेवा कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स तसेच साठवयोगटांहून पुढील वृद्धांसाठी बूस्टर डोस सुरु करण्यात आला आहे.

(हेही वाचा – पालिकेची विक्रमी कामगिरी! कोस्टल रोडच्या पहिल्या बोगद्याचे खोदकाम पूर्ण)

राज्यात भायखळ्यातील जेजे समूह सरकारी रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते बूस्टर डोस मोहिमेचे उद्धाटन करण्यात आले. मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार ५२६५ आरोग्यकर्मचाऱ्यांनी तर १८३० फ्रंटलाईन ,साठ वर्षावरील ३६२६ जणांनी बूस्टर मात्रा घेतली आहे. राज्यातील विविध सरकारी लसीकरण केंद्रात ही सुविधा विनामूल्य उपलब्ध करण्यात आली आहे. लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण केलेल्यांना बूस्टर डोस घेता येईल.

आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी हे आहेत नियम

सर्व आरोग्‍य कर्मचारी, आघाडीवर काम करणारे कर्मचारी ज्यांचे वय ६० वर्षापेक्षा कमी आहे व ज्यांची कोविन ऍपवर यापूर्वी लस घेताना कर्मचारी ऐवजी ‘नागरिक’ अशी वर्गवारी नोंद झाली आहे, अशा लाभार्थ्यांचे लसीकरण शासकीय व महानगरपालिका लसीकरण केंद्रात थेट येवून (ऑनसाइट/वॉक इन) नोंदणी पद्धतीने उपलब्ध असेल. त्यासाठी त्यांनी नोकरीच्या ठिकाणचे प्रमाणपत्र तथा ओळखपत्र सादर करणे बंधनकारक असेल. या लाभार्थ्यांना खासगी केंद्रात लस घ्यावयाची असेल तर त्यांनी शासकीय केंद्रावर येऊन प्रथम योग्य ती वर्गवारी नोंदवावी आणि नंतर खासगी केंद्रावर लस घेण्याची त्यांना मुभा असेल.

बूस्टर डोस कोणता देणार?

दुसरी मात्रा घेतलेल्या तारखेपासून ९ महिने किवा ३९ आठवडे पूर्ण झाले असल्यास, हा निकष लक्षात घेवून प्रतिबंधात्मक मात्रा दिली जाणार आहे. तसेच, संबंधित लाभार्थ्यांनी जर आधी कोविशील्ड लस घेतली असेल तर त्यांना कोविशील्ड लसीची मात्रा देण्यात येईल. ज्यांनी आधी कोवॅक्सिन लस घेतली असेल त्यांना कोवॅक्सिन लसीची मात्रा देण्यात येईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here