होय, मी हत्या केली, पण बलात्कार केला नाही! आरोपीची कबुली

126

मी हत्या केल्याचे कबूल करतो, पण बलात्कार केला नाही, अशी कबुली विनोबा भावे नगर पोलिसांनी एका तरुणीच्या हत्या आणि बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केलेल्या तिच्या प्रियकराने पोलिसांकडे दिली आहे. मात्र आरोपी स्वतःला वाचवण्यासाठी खोटे बोलत असावा, असा संशय पोलिसांना असून याबाबत तपास सुरू असल्याची माहिती विनोबा भावे नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पवार यांनी दिली आहे.

२३ नोव्हेंबरपासून ती बेपत्ता होती

कुर्ला पश्चिम कोहिनूर सिटी या ठिकाणी असलेल्या एचडीआयएल कॉलनी या ठिकाणी प्रकल्पग्रस्तासाठी बांधण्यात आलेल्या इमारतींपैकी एका रिकाम्या इमारतीच्या गच्चीवर २५ नोव्हेंबर रोजी एका तरुणीचा मृतदेह विनोबा भावे नगर पोलिसांना आढळून आला होता. या तरुणीवर हत्येपूर्वी शारीरिक संबंध ठेवण्यात आल्याचे प्राथमिक शवविच्छेदन अहवालात नमुद करण्यात आले होते. पोलिसांनी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करून तरुणीची ओळख पटवली असता सदर तरुणी ही गोवंडी टाटा नगर परिसरात राहणारी असून २३ नोव्हेंबरपासून ती बेपत्ता होती.

(हेही वाचा महापौरांमुळे गरीब रुग्ण औषधांपासून वंचित! वर्षभर लटकली औषध खरेदी)

सततच्या दबावाला कंटाळून केले ठार

या तरुणीची ओळख पटली असता पोलिसांनी २४ तासांतच तिचा प्रियकर रिजवान खान (२०) आणि त्याचा मित्र फैजल शेख (२१) या दोघांना अटक करण्यात आली. रिजवान खान हा गोवंडी परिसरातच राहणारा असून पूर्वी तो एचडीआयएल कॉलनी या ठिकाणी राहण्यास होता. तर फैजल हा कुर्ला भारतीय नगर या ठिकाणी राहण्यास आहे. “ही तरुणी गर्भवती असल्याचे सांगून लग्न करण्यासाठी दबाब आणत होती, मात्र मला तिच्यासोबत लग्न करायचे नव्हते, तिच्या सततच्या दबावाला कंटाळून तिला कुर्ला येथे भेटण्यासाठी बोलावून तिला एका रिकाम्या इमारतीच्या गच्चीवर आणले आणि तिची हत्या केली, मात्र तिच्यावर कुठल्याही प्रकारची बळजबरी अथवा बलात्कार केला नसल्याचे आरोपीने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. मात्र तिच्यासोबत हत्येपूर्वी शारीरिक संबंध झाले असल्याचे प्राथमिक शवविच्छेदन अहवालात आले असल्यामुळे बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र तिच्यासोबत आरोपीने संबंध ठेवले होते का अन्य कोणी, हा तपासाचा भाग असून याबाबत तपास सुरू असल्याचे वि. भा. नगर पोलिस ठाण्याचे वपोनी. पवार यांनी सांगितले. तसेच ही तरुणी गर्भवती नव्हती आणि लहानपणापासून तिला गर्भपिशवीच नसल्याचे शवविच्छेदन अहवालात आले असून गर्भपिशवीच नसल्यामुळे ती गर्भवती राहूच शकत नाही, असे पवार यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.