घोरपड या सरपटणाऱ्या प्राण्याची शिकार करून त्याचे मांस खाताना एका सऱ्हाईत गुन्हेगाराविरोधात ठाणे वनविभागाने वनगुन्हा नोंदवला आहे. मूळ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या गुन्हेगाराला न्यायालयीन कोठडी द्यायला कोव्हिशिल्ड लसीकरणाची समस्या उभी राहिली आहे. बाजारात कोव्हिशिल्ड लस उपलब्ध नसल्याने वनविभागाला कारवाईसाठी न्यायालयात उभे करता येत नाही आहे.
काय आहे प्रकरण?
गेल्या आठवड्यात ठाण्यात पाटलीपाडा येथून रात्री घोरपडीचे मांस खाताना पोलिसांनी या आरोपीला रंगेहाथ पडकले होते. संपूर्ण ठाणे परिसरात घोरपडीची शिकार करून मांस खाण्याचा हा पहिलाच प्रकार उघडकीस आला आहे. १ सप्टेंबर रोजी गुरुवारी मध्यरात्री पाटलीपाडा येथे पोलिसांनी या सऱ्हाईत गुन्हेगाराच्या घरी धाड टाकली. या आरोपीच्या घरात घोरपडीचे शिजलेले मांस खाताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्या फ्रिजमध्ये घोरपडीचे कच्चे मांस आणि हाडेही मिळाली. आरोपीच्या घरात शिकारीचे साहित्य, चाकू आणि कोयताही मिळाला. या प्रकरणाची वनविभागाने दखल घेत आरोपीविरोधात वनगुन्हा दाखल केला.
बाजारात कोव्हिशिल्ड उपलब्ध नाही
न्यायालयीन प्रकरणासाठी, आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यापूर्वी त्याची कोरोनाप्रतिबंधात्मक दोन लसीकरण आणि आरटीपीसीआर चाचणी आवश्यक आहे. आरोपीने कोव्हिशिल्ड लशीची पहिली मात्रा घेतली आहे. लसीकरणाचे दोन्ही टप्पे पूर्ण न झाल्याने तसेच आरटीपीसीआरचा अहवाल प्रलंबित असल्याने आरोपीला न्यायालयासमोर उभे करण्यात वनविभागाची पंचाईत झाली आहे. त्यामुळे वनाधिकारी सध्या कोव्हिशिल्ड लस शोधण्यात मग्न आहेत.
Join Our WhatsApp Community