पोलिसांच्या हाताला झटका देऊन आरोपीची धावत्या रेल्वेमधून उडी

उत्तर प्रदेशातून मुंबईत आणण्यात येणाऱ्या एका आरोपीने धावत्या रेल्वेमधून उडी टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला, यामध्ये गंभीर जखमी झालेल्या आरोपीचा मृत्यु झाल्याची घटना मनमाड रेल्वे स्थानकाजवळ घडली.

लखनऊ पुष्पक एक्स्प्रेसने मुंबईकडे निघालेले

तबरत रयानी (३०) असे मृत आरोपीचे नाव आहे. कांदिवली येथील एका चोरीच्या गुन्ह्यात त्याला कांदिवली पोलिसांनी उत्तर प्रदेश राज्यातील बलरामपूर येथून अटक केली होती. २० जुलै रोजी कांदिवली पोलीस ठाण्याचे पथक त्याला घेऊन लखनऊ पुष्पक एक्स्प्रेसने मुंबईकडे निघाले होते. २१ जुलै रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास रयानी याने लघुशंकेला जायचे असल्याचे सोबत असलेल्या पोलीस पथकाला सांगितले.

आरोपीचा मृत्यू

एका पोलीस हवालदार त्याला सोबत घेऊन रेल्वेच्या डब्ब्यातील शौचालयाकडे जात असताना रयानी याने पोलीस हवालदारच्या हाताला झटका देऊन त्याने धावत्या गाडीतून उडी टाकली. पोलीस पथकाने तात्काळ रेल्वेची साखळी ओढली असता रेल्वे मनमाड रेल्वे स्थानकावर थांबली. रेल्वे पोलिसांच्या मदतीने कांदिवली पोलीस पथकाने रयानी याचा शोध घेतला असता रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर आरोपी रयानी हा जखमी अवस्थेत मिळाला. पोलिसांनी त्याला तात्काळ नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयात आणले असता उपचार सुरू असताना दुसऱ्या दिवशी  त्याचा मृत्यू झाला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here