“मेरे को इधर लॉकअप मे मत रखो, नही तो मैं खुदको मारुंगा, और इधर छोडके गये तो मैं अपनी जान दे दुंगा” याप्रकारची धमकी देऊन एका आरोपीने स्वतःचे डोके भिंतीला आपटून स्वतःला गंभीर इजा करुन घेतली आहे. माहिम येथे नुकतीच ही घटना उघडकीस आली आहे. या लॉकअप मध्ये असे काय आहे की, याठिकाणी आरोपी राहण्यास घाबरत होता? याबाबतची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
लॉकअपमध्येच दिली शिपायांना धमकी
मोहम्मद सोहेल उमर कुरेशी(३५) असे या आरोपीचे नाव आहे. कुर्ला विनोबा भावे पोलिस ठाण्याने मोहम्मद कुरेशी याला चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. मोहम्मद कुरेशी हा सराईत चोर असून, त्याला मंगळवारी दुपारी विनोबा भावे नगर पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक माहिम पोलिस ठाण्याच्या आवारात असलेल्या जनरल लॉकअप मध्ये ठेवण्यासाठी घेऊन आले. पोलिसांनी त्याला जनरल लॉकअप मध्ये टाकताच “मेरे को इधर लॉकअप मे मत रखो नही तो मैं खुदको मारुंगा, और इधर छोडके गये तो मैं अपनी जान दे दुंगा” असे बोलून तो लॉकअप ड्युटीवर असणाऱ्या पोलिस शिपायांना धमकी देऊ लागला.
(हेही वाचाः कराची से रॉकेट मारुंगा… परमबीर सिंग खंडणी प्रकरणात आता अंडरवर्ल्डची एंट्री)
असा केला ड्रामा
पोलिसांनी त्याची समजूत काढून त्याला लॉकअप मध्ये बंद केले असता, मोहम्मद कुरेशी हा जोरजोरात आरडाओरड करू लागला आणि लॉकअपच्या भिंतीवर डोके आपटून घेऊ लागला. त्यानंतर त्याने पाण्याच्या भरलेल्या बाटलीने लॉकअप मधील दोन्ही सीसीटीव्ही कॅमेरे फोडले आणि भिंतीला डोके आपटून स्वतःला दुखापत करुन घेतली. ड्युटीवरील पोलिसांनी त्याला उपचारासाठी सायन रुग्णालयात आणले असता, त्याने पोलिसांना धक्काबुकी करुन सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याच्यावर उपचार करुन त्याला पुन्हा माहिम येथील जनरल लॉकअप मध्ये बंद करण्यात आले असून, माहिम पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community