नियम मोडणा-या 100 वाहन चालकांवर दररोज कारवाई झालीच पाहिजे; पोलिसांना टार्गेट

123
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांना टार्गेट देण्यात आले आहे. मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन ई-चलन मशीन देऊन दिवसाला १०० वाहन चालकांवर कारवाईचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिका-यांकडून देण्यात आले आहे. दिवसाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
मुंबई पोलीस दलात महिन्याभरापूर्वी वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई पोलीस दलातील सर्वच सह पोलीस आयुक्त बदलण्यात आले तसेच मुंबईला प्रथमच विशेष पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत एकूण ९४ पोलीस ठाणी आणि चार सायबर पोलीस ठाणी आहेत. नवीन सह पोलीस आयुक्त (कावसु) सत्यनारायण चौधरी यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यांना वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर ई-चलन कारवाई करण्याचे व दिवसाला सरासरी १०० ई- चलन कारवाई करण्याचे टार्गेट पूर्ण करण्याचे आदेश दिले  असल्याचे एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे. तसेच, प्रत्येक पोलीस ठाण्यांना दोन ई- चलन मशीन देण्यात आले असून, हे ई- चलन मशीन नाकाबंदीच्या ठिकाणी असणाऱ्या अंमलदार यांच्याकडे देण्यात आलेले असल्याचे पोलिस निरीक्षक यांनी सांगितले.
टार्गेट पूर्ण करण्यासाठी पोलिसांना दिवसातून तीन ते चार वेळा हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी लावून हे टार्गेट पूर्ण करावे लागते. या दरम्यान वाहन चालकासोबत वाददेखील होत असल्याचे दुसऱ्या एका अधिका-याने म्हटले आहे. एकीकडे वाहतूक पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागते तर दुसरीकडे नाकाबंदीमध्ये वाहनांना अडवून कुठली न कुठली त्रुटी काढून ई-चलनाची कारवाई करण्यात येत असल्यामुळे वाहन चालकांमध्ये नाराजी आहे. त्यात सर्वात अधिक नाराजी दुचाकी चालकांमध्ये असून त्यांना पोलिसांकडून साॅफ्ट टार्गेट केले जात असल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे.
मुंबईतील असुरक्षित रस्ते, मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अगोदरच हैराण असलेल्या वाहन चालकांवर पोलिसांकडून होणाऱ्या या कारवाईमुळे वाहनचालक पुरते बेजार झाले आहेत. वरिष्ठांनी दिलेले टार्गेट दररोज पूर्ण होईल असे नाही, कधी ५० तर कधी ७० ई- चलनच्या कारवाई करण्यात येतात. १०० कारवाई दररोज करण्यात यावी, अशी बळजबरी वरिष्ठांकडून नसल्याचे एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने सांगितले आहे .
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.