लग्न समारंभासह इतर कार्यक्रम महापालिकेच्या रडारवर

133

कोविड पाठोपाठ ओमायक्रॉनचा धोका कायम असूनही मुंबईतील निर्बंधांमध्ये शिथिलता आणल्यानंतर लग्न समारंभांसह इतर आयोजित कार्यक्रमांमध्ये कोविड नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे आगामी ख्रिसमससह नवीन वर्षांच्या पार्श्वभूमीवर आयोजित पाटर्यांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे, असे असले तरी लग्न समारंभासह इतर कार्यक्रम हे पालिकेच्या रडारवर असणार आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लग्न समारंभामध्ये कारवाईचा आहेर महापालिकेच्यावतीने दिला जाणार आहे.

पालिकेकडून नागरिकांना आवाहन

कोविड – १९ विषाणूचा ओमायक्रॉन हा नवीन प्रकार जगभरात वेगाने पसरत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण होऊ लागला आहे. कोविडची तिसरी लाट येऊ नये म्हणून शासन आणि प्रशासन वारंवार आवाहन करित आहे. असे असले तरी त्याचे बहुतांश ठिकाणी योग्यरित्या पालन केले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. विशेषतः लग्न समारंभ आणि इतर समारंभांमध्ये नियम मोडले जात असल्याचे आढळत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी शासनाने आखून दिलेल्या मर्यादांचे योग्य पालन करावे, कोणत्याही प्रकारची गर्दी टाळावी, मास्क लावण्यासह कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, प्रत्येकाने लसीकरण पूर्ण करुन घ्यावे, असे नम्र आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी जनतेला केले आहे. दरम्यान, नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर महानगरपालिकेच्या विभाग कार्यालय स्तरावरील पथकांकडून तसेच पोलीस प्रशासनाकडून सक्त कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले आहे.

(हेही वाचा – पंतप्रधान मोदी म्हणाले… UP+YOGI, बहुत है उपयोगी’)

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

सर्व जनतेचे सहकार्य, काटेकोरपणे केलेले कोविड व्यवस्थापन आणि कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला दिलेला वेग यामुळे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड संसर्ग परिस्थिती आज संपूर्णपणे नियंत्रणात आहे. मात्र, ओमायक्रॉन या नवीन विषाणू प्रकारामुळे जगातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा परिस्थिती हाताबाहेर गेली असून टाळेबंदीची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतात तसेच महाराष्ट्रात अशी स्थिती उद्भवू नये म्हणून अनुक्रमे केंद्र व राज्य सरकारच्या वतीने जनतेला सातत्याने आवाहन करुन खबरदारी घेण्याची विनंती करण्यात येत आहे.

नियमांची पायमल्ली केल्यास कारवाई

मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबईकरांना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र, त्याला पुरेसा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. विशेषतः लग्न समारंभ आणि इतर समारंभांचे आयोजन करताना नियमांची पायमल्ली करुन गर्दी केली जात आहे. समाजावर प्रभाव असणाऱ्या नामांकित व्यक्ती, प्रतिष्ठित नागरिक यांनीही सर्व बाबींचे भान राखणे आवश्यक आहे. कोणीही आणि कोणतेही नियम मोडलेले आढळले तर, प्रशासनाने आता पुन्हा एकदा कठोरपणे कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.