ज्येष्ठ सनदी वास्तूरचनाकार आणि इतिहासकार प्रतापराव वेलकर यांचे वृद्धापकाळाने सोमवार, दि. २० डिसेंबर २०२१ यादिवशी दुःखद निधन झाले. वास्तू रचनाकार म्हणून त्यांचे मुंबई महानगर पालिकेच्या नगर नियोजनात मोठे योगदान होते. या वर्षी त्यांनी शताब्दी वर्षात पदार्पण केले होते. त्यांना मोठा सामाजिक वारसा लाभला होता. आर्किटेक्ट म्हणून त्यांनी अनेक मोठे काम करून ठेवले आहे तसेच इतिहास संशोधन आणि लेखन क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे. ईश्वर त्यांच्या पुण्यात्म्यास सद्गती देवो, अशी भावपूर्ण श्रद्धांजली स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी वाहिली आहे.
प्रताप वेलकर यांच्याबद्दल…
प्रताप वेलकरांनी डॉ. ना. दा. सावरकर यांच्याविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेमुळे चरित्र लिहावयाचे कार्य अंगीकारले. शासनाकडे रीतसर आवेदन करून पोलिस फाईल्स, शासकीय अर्काईव्हजमधील कागदपत्रे, इ. अभ्यासण्याची अनुमती मिळविली. वर्षभर त्या त्या कार्यालयात चिकाटीने जाऊन, तेथील साधार माहिती, कागदपत्रे अभ्यासून गोळा केली. त्यानंतर परिश्रमपूर्वक चरित्राची मुद्रणप्रत सिद्ध केली. डॉ. सावरकरांचे चरित्रलेखन, वस्तुनिष्ठ परिस्थितीजन्य पुरावा पुढे ठेवून झालेले आहे. हा चरित्र ग्रंथ तत्कालीन महाराष्ट्राचा सांस्कृतिक, सामाजिक आणि सशस्त्र क्रांतीचा राजकीय इतिहास आहे.
(हेही वाचा -ऑल द बेस्ट! दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर)
प्रताप वेलकर यांचे वडील डॉ. मोतीराम वेलकर हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते. ‘लोकमान्य टिळक आणि डॉ. वेलकर – लोकमान्यांच्या राजकीय चळवळीतील राजकीय सहभाग’ प्रताप वेलकर यांनी चरित्र ग्रंथ लिहून टिळक पर्वाच्या इतिहासातील अज्ञात राहिलेले पान उलगडून दाखविले आहे. प्रताप वेलकर यांनी लोकमान्य टिळक आणि डॉक्टर वेलकर, तिसरा सावरकर, पाठारे प्रभूंचा इतिहास, हिंदु साम्राज्याचा इतिहास (संकलन), महाराष्ट्राच्या उज्वल इतिहासाची अक्षम्य उपेक्षा, व्यक्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महाराष्ट्राचा इतिहास उज्वल करणारे पाच मुंबईकर, शूरां मी वंदिले, हस्ताक्षर निरिक्षण ही पुस्तके लिहिली आहेत.
Join Our WhatsApp Community