सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 215 कोटींच्या खंडणी प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, या आरोपपत्रात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ईडीच्याकडून दिल्ली न्यायालयात मनी लॉंड्रिंग अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अलीकडेच ईडीने जॅकलिनची सुमारे 7 कोटी 12 लाखांची एफडी जप्त केली होती. आरोपी म्हणून जॅकलिनचे नाव आल्याने आता तिच्या अडचणीत वाढ झाली असून, या प्रकरणी ईडीकडून जॅकलिनविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
(हेही वाचा – सुनावणी लांबणीवर! FIFA च्या कारवाईवर ‘या’ दिवशी होणार फैसला)
सुकेशने जॅकलिनला 10 कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्यात
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे सुकेश चंद्रशेखरसोबतचे कनेक्शन समोर आल्यापासून ती कायदेशीर अडचणीत सापडली आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलिनची याआधीही अनेक वेळा चौकशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुकेशने जॅकलिनला साधारण 10 कोटी रुपयांच्या भेटवस्तू पाठल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. ईडीने मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत जॅकलिनची 7 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. सुकेशने जॅकलिनलाच नव्हे तर तिच्या कुटुंबीयांनाही मौल्यवान, महागड्या भेटवस्तू दिल्याचे तपासात समोर आले आहे. यामध्ये कार महागड्या वस्तू, यासह 1.32 कोटी आणि 15 लाख रूपयांच्या निधीचा समावेश होता.
कोण आहे सुकेश चंद्रशेखर
मिळालेल्या माहितीनुसार, सुकेशवर वेगवेगळ्या राज्यात जवळपास 32 गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध सीबीआय, ईडी आणि आयकर तपास सुरू आहेत. सुकेश चंद्रशेखरवर प्रभावशाली असल्याचे भासवून लोकांना फसवल्याचा आरोप आहे. मोठमोठ्या व्यक्तींसोबत फोटो दाखवून तो लोकांना फसवायचा आणि त्यांच्या कामासाठी सर्वाधिक पैसे घेत असे. त्याचप्रमाणे, त्याने दिल्लीतील एका व्यावसायिकाच्या पत्नीकडून 215 कोटी रुपये वसूल केले होते आणि त्याच्या ओळखीच्या आधारे आपण तिच्या पतीला जामीन मिळवून देऊ असे सांगितले होते. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सुकेश तुरुंगातूनच फसवणुकीचे रॅकेट चालवत होता, अशीही माहिती मिळतेय.
Join Our WhatsApp Community