कोरोनाबाधित असूनही चित्रीकरण करणा-या गौहर खानवर गुन्हा दाखल!

अशा प्रकारची कृती केल्यामुळे आणि कोविड विषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अभिनेत्रीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ‘के पश्चिम’ विभागांतर्गत ओशिवरा परिसरात राहणाऱ्या चित्रपट अभिनेत्री गौहर खानवर कोविड विषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी, ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविडची बाधा झालेली असतानाही गौहर खान सार्वजनिक परिसरांमध्ये वावरत होती. एवढेच नव्हे तर तिने आपले चित्रीकरणही सुरू ठेवले. परिणामी कोविड संसर्ग इतर व्यक्तींना होऊ शकेल, अशा प्रकारची कृती केल्यामुळे आणि कोविड विषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गौहर खानवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तिला महापालिकेच्या विलगीकरण केंद्रामध्ये दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

कोरोना असतानाही करत होती चित्रीकरण

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागाच्या आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांद्वारे याबाबत पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १८८, २६९, २७० आणि साथरोग नियंत्रण कायद्याच्या कलम २ व ३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तक्रारीमध्ये नमूद केल्यानुसार या गौहरची कोविड चाचणी करण्यात आली होती. ज्यानुसार ती कोरोनाबाधित असल्याचे ११ मार्च रोजी निष्पन्न झाले होते. मात्र त्यानंतर तिने घरातच विलगीकरण होणे बंधनकारक असताना, नियमांचे उल्लंघन करुन सार्वजनिक परिसरातील वावर सुरू ठेवला असल्याचे समजले. या अनुषंगाने के पश्चिम विभागातील आरोग्य खात्याचे कर्मचारी १४ मार्च २०२१ रोजी संध्याकाळी उशिरा गौहरच्या घरी गेले असता वारंवार विनंती करुनही तिने दरवाजा उघडला नाही. त्यानंतर दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तिचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यासही तिने नकारात्मक प्रतिसाद दिला. यानंतर परिसरातील एका समाजसेवकांच्या मदतीने विनंती केली असता, तिने दरवाजा उघडला. त्यानंतर विलगीकरणाचा शिक्का त्यांच्या हातावर नियमानुसार उमटविण्यात आला.

(हेही वाचाः राज्यात कोरोनाचा उद्रेक; १६,६२० नवीन रुग्ण!)

गुन्हा दाखल

वरील तपशिलानुसार कोविड बाधा असूनही सार्वजनिक परिसरांमध्ये वावरणे, चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये सहभाग घेणे आणि परिणामी इतर लोकांना कोविड संसर्ग होऊ शकेल व कोविडचा प्रादुर्भाव वाढू शकेल असे कृत्य केल्यामुळे, गौहरच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनुसार मुंबई पोलिसांद्वारे त्यांच्यावर संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

महापालिकेकडून आवाहन

वरील अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिद्वारे पुन्हा एकदा आवाहन करण्यात येत आहे की, नागरिकांनी कोविड विषयक सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. या नियमांमध्ये प्रामुख्याने सार्वजनिक परिसरात वावरताना मास्क वापरणे, एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, वारंवार हात धुणे यासह कोविड बाधा झाली असल्यास विलगीकरण विषयक नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करावे, यासारख्या बाबींचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here