हवा शुद्धीकरण तंत्रज्ञान कंपन्यांकडून ‘त्या’ समित्यांसमोर सादरीकरण

101
मुंबई महानगर क्षेत्रातील हवा प्रदूषण विशेषतः धूळ नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशान्वये गठीत करण्यात आलेली समिती आणि तांत्रिक सल्लागार समिती यांची संयुक्त बैठक अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडली. यात हवा शुद्धीकरण तंत्रज्ञान क्षेत्रातील  ७ ते ८ कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि त्यांनी या समितीसमोर आपापल्या तंत्रज्ञानाची माहिती सादर केली.
मुंबई महानगरासह मुंबई प्रदेशात अत्यंत मोठ्या प्रमाणावर होत असलेली विकास कामे, बांधकामे यासह हवेतील बदलामुळे हवेचा गुणवत्ता स्तर सध्या खालावला आहे. ही बाब लक्षात घेता प्रदूषणासाठी धूळ हा देखील एक घटक कारणीभूत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एकूण सात सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार अहवाल तयार करण्याच्या दृष्टीने समितीचे अध्यक्ष अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या दालनात मंगळवारी दुपारी बैठक झाली. त्यावेळी तांत्रिक सल्लागार समितीचे सर्व सदस्यही उपस्थित होते.
हवा प्रदूषण व धूळ नियंत्रण समितीचे सदस्य सचिव उपायुक्त (पर्यावरण) अतुल पाटील, उपायुक्त (पायाभूत सुविधा)  उल्हास महाले, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन)  चंदा जाधव, प्रमुख अभियंता (रस्ते)  मनीष पटेल, प्रमुख अभियंता (विकास नियोजन)  सुनील राठोड, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी  कार्तिक लंगोटे आणि महानगरपालिका आयुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी कार्यकारी अभियंता  सतीश गीते त्याचप्रमाणे तांत्रिक सल्लागार समितीच्या वतीने निरी संस्थेचे संचालक, आयआयटी मुंबईचे प्रतिनिधी, भारतीय हवामान खात्याचे प्रतिनिधी, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रतिनिधी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रतिनिधी आणि राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयातील श्वसन विकार तज्ञ डॉ. अमिता आठवले इत्यादी मान्यवर या संयुक्त बैठकीला उपस्थित होते.
मुंबई महानगर क्षेत्रातील हवा प्रदूषण रोखणे आणि धूळ नियंत्रित करणे यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच मुंबई महानगरात लागू करावयाच्या प्रमाणित कार्यपद्धती मध्ये कोणकोणत्या मार्गदर्शक सूचना समाविष्ट असल्या पाहिजेत, त्याचा तपशील देखील दोन्ही समित्यांच्या प्रतिनिधींनी मांडला. हवा शुद्धीकरणाची उपाययोजना करताना यंत्रणा उभारणे आवश्यक असल्याने या क्षेत्रातील नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींना देखील या बैठकीमध्ये सादरीकरण करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यापैकी ७ ते ८ कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते, त्यांनी समितीसमोर आपापल्या तंत्रज्ञानाची माहिती सादर केली.
गुरुवार  १६ मार्च २०२३ रोजी अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा समितीची बैठक होणार आहे. तसेच महानगरपालिका मुख्यालयात शुक्रवार  १७ मार्च २०२३ रोजी संबंधित भागीदारांची मुख्य कार्यशाळा आयोजित करण्याचे देखील प्रस्तावित आहे. त्यानंतर विभाग कार्यालयांच्या स्तरावर देखील कार्यशाळा आयोजित करून हवा प्रदूषण व धूळ नियंत्रणाची कार्यवाही वेगाने राबवली जाणार आहे. त्या दृष्टीने अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी विविध सूचना या बैठकीत केल्या.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.