उर्दू लर्निंग सेंटरचे पहिले विद्यार्थी ठरणार आदित्य ठाकरे: समाजवादी पक्षानं उर्दूतून पाठवलं पत्र!

183

भायखळ्यामध्ये महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या प्रयत्नातून उभारण्यात येणाऱ्या उर्दू भवनाचे समाजवादी पक्षाने स्वागत केले असून, या उर्दु लर्निंग सेंटरच्या उभारणीपूर्वी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना उर्दुतूनच आपल्या मागणीचे पत्र पाठवण्यात आले आहे. ज्यामध्ये समाजवादी पक्षाने उर्दू भाषेच्या संवर्धनासाठी घेतलेल्या पुढाकाराबाबत आदित्य ठाकरे यांना उर्दूतूनच पत्र पाठवून उर्दू लर्निंग सेंटरमधील पहिले विद्यार्थी बनवण्याचा सन्मान देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे यापुढे सरकारमधील सर्वच मंत्र्यांना मुस्लिम लोकप्रतिनिधींसह नेत्यांच्यावतीने उर्दू भाषेतून पत्र व्यवहार केला जाणार आहे. याबाबतचे आवाहनच समाजवादी पक्षाच्यावतीने मुस्लिम समाजातील नेत्यांना व लोकांना केले जाणार आहे.

Urdu 1

समाजवादी पक्षाचे भायखळा आग्रीपाडा येथील नगरसेवक व महापालिकेचे समाजवादी पक्षाचे गटनेते तसेच भिवंडी पूर्व येथील आमदार रईस शेख यांनी २२ जानेवारी रोजी राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना उर्दूतून पत्र लिहित भायखळा येथे उर्दू भवन उभारण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबाबत कौतुक करत आभार मानले आहे.

( हेही वाचा : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अंथरली झाडा-फुलांची भगवी शाल! )

उर्दू लर्निंग सेंटरसाठी शिवसेनेकडून पुढाकार

आग्रीपाडा येथे उभारण्यात येणाऱ्या उर्दू लर्निंग सेंटरसाठी शिवसेनेकडून पुढाकार घेण्यात येत आहे. त्यामुळे उर्दू भवनाच्या माध्यमातून उर्दू भाषेच्या संवर्धनासाठी जो पुढाकार घेतला आहे त्याबाबतही त्यांनी मनापासून आभार आहे. भायखळ्याचे यापूर्वीचे माजी आमदार वारीस पठाण यांनी पाच वर्षे या उर्दू भवनाची स्वप्ने दाखवली होती. परंतु त्यांना हे स्वप्न पूर्ण करता आले नव्हते. पण आता आपण स्वत: यासाठी पुढाकार घेतल्याने हे भवन उभारले जाईल, असा विश्वासही रईस शेख यांनी आपल्या पत्रात व्यक्त केला आहे. राज्यात आपले महाविकास आघाडीचे सरकार आहे आणि महापालिकेतही आपली सत्ता आहे. त्यामुळे उर्दू भवन उभारण्यात कोणतीही अडचण येणार नाही असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

( हेही वाचा : मुंबईकरांनो… कडाक्याच्या थंडीत बाहेर पडताय? अशी घ्या काळजी )

रईस शेख यांचे उर्दूतून पत्र

भूतकाळात काय झाले याचा विचार न करता आणि भविष्याचा विचार करत समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील अध्यक्ष अबू असिम आझमी यांनी ज्या आत्मविश्वासाने आपल्या आमदारांचा पाठिंबा आपल्या सरकारला दिला आहे, त्यानुसार आपणही समान किमान कार्यक्रम अमलात आणाल अशीही खात्री आपल्याला असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

त्यामुळे उर्दू भवनासाठी पुढाकार घेतानाच अल्पसंख्याक समाजाच्या दोन प्रमुख प्रश्नांकडेही त्यांनी सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला अहे. ज्यामध्ये त्यांनी उच्च न्यायालयाने मुस्लिम आरक्षणाबाबत जे मंजूर केले आहे, त्याची त्वरीत अंमलबजावणी केली जावी आणि महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाजातील लोकसंख्येनुसार त्यांच्या विकासासाठी स्वतंत्र व भरीव निधीची तरतूद केली जावी असेही या पत्रात शेख यांनी नमूद केले आहे.

याबाबत रईस शेख यांना उर्दू भाषेतील पत्राबाबत विचारले असता त्यांनी शिवसेनेच्या प्रयत्नाने उर्दू भाषेच्या संवर्धनासाठी उर्दू भवनाची उभारणी केली आहे, त्यामुळे या भाषेच्या संवर्धनासाठीच उर्दू भाषेतूनच राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांना पत्र लिहिले आहे, जेणकरून या भाषेचे संवर्धन होईल. प्रस्तावित उर्दू लर्निंग सेंटरमधील पहिले विद्यार्थी हे आदित्य ठाकरे ठरतील. त्यामुळे त्यांना उर्दू भाषेचा अभ्यास असावा, या भाषेची जाण व्हावी म्हणूनच हे पत्र उर्दूतून लिहिले असल्याचे शेख यांनी म्हटले आहे. या पत्राबरोबरच हिंदीतूनही पत्र जोडले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.