देशातील पीएफआय कार्यालयांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेसह राज्यातील पोलिसांनी छापे टाकले होते. यानंतर या संघटनेवर केंद्रीय गृहमंत्रालयाने पाच वर्षांसाठी बंदी आणली आहे. आता पीएफआय संदर्भात नवे खुलासे समोर येत आहेत. पीएफआय सदस्यांचे अनेक व्हॉट्सअॅप ग्रुप असून या ग्रुपचा मुख्य अॅडमिन हा पाकिस्तान असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
( हेही वाचा : सानुग्रह अनुदानाची घोषणा : २० दिवस उलटत आले तरी महापालिका कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईना रक्कम )
एटीएसने केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती
एटीएसने केलेल्या चौकशीत ही माहिती मिळाली असून व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये १७५ सदस्य होते त्यापैकी बरेचजण अफगाणिस्तान आणि युएईचे होते. भारतात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण कट रचल्याचा आरोप यांच्यावर आहे. म्हणूनच पीएफआय आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या संघटनांवर पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. एनआयए, महाराष्ट्र एटीएस आणि ईडीने ही मोठी देशव्यापी कारवाई केली आहे.
पीएफआयशी संबंधित असलेल्या पाच जणांना महाराष्ट्र एटीएसने मालेगाव, कोल्हापूर, बीड आणि पुणे येथून अटक केली. अधिकाऱ्यांनी या पाच जणांचे फोन, कॉम्प्युटर, हार्ड डिस्क, लॅपटॉप आणि त्यांची बॅंकेची कागदपत्रे जप्त केली. हे सदस्य बंदी घालण्यात आलेल्या सिमी संघटनेप्रमाणे काम करत होते.