आष्टा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरुन झालेला वाद आता पेटणार आहे. शिवप्रेमींनी रातोरात बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला आहे. परिसरातील संपूर्ण वीज पुरवठा खंडित करुन प्रशासनाने प्रचंड पोलीस बंदोबस्तात रात्रीच शिवरायांचा पुतळा हटवला आहे. तर प्रशासनाच्या निषेधार्थ बुधवारी आष्टा शहरासह वाळवा तालुका बंदची हाक देण्यात आली आहे.
आष्टा शहरात गेल्या 9 दिवसांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दोनदा प्रतिष्ठापना करण्यात आली. मंगळवारी पहाटेच्या सुमारास शिवप्रेमींनी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 फुटी अश्वारुढ पुतळ्याची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर प्रशासनाने पुतळा परिसरात प्रंचड पोलीस बंदोबस्त तैनात करत, कलम 144 लागू केले.
( हेही वाचा: कारागृहातील कैद्यांचा भार कमी करण्यासाठी ‘या’ जिल्ह्यांत नवीन कारागृहं )
वीज खंडित करत, पुतळा हटवला
प्रशासनाकडून पुतळा हटवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आष्टा शहरातील सांगली- इस्लामपूर रस्त्यावर भाजप नेते शशिकांत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली शिवप्रेमींनी रास्ता रोको केला, यावेळी पोलीस आणि शिवप्रेमींमध्ये झटापटीचा प्रकार घडला, त्यानंतर पोलिसांनी 30 आंदोलकांना ताब्यात घेतले. यानंतर प्रशासनाने पुतळा परिसरातील वीज पुरवठा खंडित करुन मंगळवारी रात्रीच्या सुमारास पुतळा हटवण्याचे काम सुरु केले आणि पोलिसांच्या कडक बंदोबस्तात महाराजांचा पुतळा हटवण्यात आला.