हिवाळी अधिवेशन: ‘त्या’ आठ जणांमुळे प्रशासन चिंतेत

114

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर विधानभवनात प्रवेश देण्यासाठी घेण्यात आलेल्या ‘आर्. टी. पी. सी. आर्.’ च्या चाचणीत ८ जणांची चाचणी पॉझिटिव्ही आली आहे. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस आणि त्याचसमवेत ‘आर्. टी. पी. सी. आर्.’ ची चाचणी विधानभवनातील प्रवेशासाठी बंधनकारक करण्यात आली असली तरी मात्र प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. बुधवारी २२ डिसेंबरपासून चालू होणार्‍या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन प्रवेशासाठी खबरदारी म्हणून पत्रकार, अधिकारी आणि आमदार यांची ‘आर्. टी. पी. सी. आर्.’ ची चाचणी करण्यात आली. एकूण २ हजार ६७८ जणांची ही चाचणी करण्यात आली आहे.

‘ओमायक्रॉन’चा धोका, उपाययोजनांची काटेकोर कार्यवाही करा’

अधिवेशन संदर्भातील ‘आर्. टी. पी. सी. आर्.’ ची चाचणी, सुरक्षा, कोविड प्रतिबंधात्मक कार्यवाही, सभागृहातील आसन व्यवस्था, अग्नीसुरक्षा आणि उपाहारगृह या उपाययोजनांचा उच्चस्तरीय बैठकीत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी आढावा घेतला. ‘ओमायक्रॉन’चा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर कार्यवाही करण्याच्या सूचना सभापतींनी दिल्या आहेत.

(हेही वाचा – विरोधकांचा चहापानावर बहिष्कार, अजित पवारांकडून भाजपवर खोचक टीका)

अभ्यागतांना प्रवेश नाही

अधिवेशन कालावधीत गर्दी होऊन संसर्ग वाढू नये, यासाठी अभ्यागतांना प्रवेश देण्यात येणार नाही. स्वीय सहायकांसाठी बसण्याची व्यवस्था विधान भवनासमोरील वाहनतळ आवारात स्वतंत्र मंडप टाकून करण्यात आली आहे, तर मंत्रीसाठी आस्थानपनेवरील कर्मचारी यांनाही अत्यंत मर्यादित संख्येने प्रवेश देण्यात येणार आहे.

सभागृहांमध्ये निगेटिव्ह प्रेशर यंत्रणा 

विधानसभा सभागृहामध्ये सुयोग्य अंतर राखण्याच्या दृष्टीने अधिवेशन कालावधीमध्ये सन्माननीय सदस्यांच्या बसण्याची व्यवस्था १ आसन सोडून करण्यात आली आहे. गतवर्षीप्रमाणेच सभागृहाच्या गच्चीतही (‘गॅलरी’तही) सदस्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विधानपरिषद सभागृहामध्ये आसन व्यवस्था पुरेशी असल्यामुळे सदस्यांची बसण्याची व्यवस्था सभागृहामध्येच करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.