मुंबईकरांनो सावधान! ८०० लीटरहून अधिक भेसळयुक्त दूध जप्त, पोलीस आणि एफडीएची संयुक्त कारवाई

149

सीलबंद दूधाच्या साठ्यात पाण्याची भेसळ करणारे धारावीतील मोठे रॅकेट पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी उघडकीस आणले. १५ सप्टेंबर रोजी भल्यापहाटे अधिका-यांनी धारावीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारत तब्बल ८०० लीटरहून अधिक दूधाचा साठा नष्ट केला. या कारवाईत धारावीतील शाहूनगर पोलीस ठाण्यात एफडीएने सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

( हेही वाचा : तर शिवाजीपार्कवर दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्याला परवानगी नाकारणार? )

धारावीत दूधाच्या पिशव्यांमध्ये पाण्याची भेसळ होत असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. ही टीप मिळताच पोलिसांच्या गुन्हे नियंत्रण शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखा विभागाने अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना भेसळयुक्त दूधाविषयी माहिती दिली. १५ सप्टेंबरला पोलिसांच्या दोन्ही शाखांसह धारावीत धाड टाकण्याचा निर्णय अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी घेतला. रात्री धारावीतील ए के गोपाल नगर आणि इंदिरा नगर येथे पोलीस आणि एफडीएच्या अधिका-यांनी छापे टाकले. मध्यरात्री उशिरा धारावीत प्रसिद्ध दूध कंपन्यांच्या दूधाच्या पिशव्या फोडल्या जायच्या आणि त्यात पाणी मिश्रित दूध भरले जायचे. हा प्रकार एफडीएच्या अधिका-यांनी पोलिसांच्या मदतीने रंगेहाथ पकडला. सकाळी साडेआठपर्यंत ही कारवाई सुरु होती. या कारवाईत ८०७ लीटरचा ४५ हजार ८५२ रुपयांचा भेसळयुक्त दूधाचा साठा एफडीए अधिका-यांनी नष्ट केला.

अटक केलेल्या आरोपींची नावे –
१) सेदूल अनंतारिया खेरिंग
२) कोमरवेल्ली नास्या बोबली
३) वेंकटा रामलू याल्गाबोएना
४) नससिंह राज्य
५) जहांगिली क्रिशताह अनंताह
६) नागेश रांगमलिया मंद्रा

कारवाईतील अमूल ताजा कंपनीचे दूध, गोकूळ कंपनीचे क्रिम मिल्क आणि गायीचे दूध, गुडमॉर्निंग कंपनीचे दूध आदी उत्पादने नष्ट करण्यात आली. काही उत्पादने दोन्ही धाडीत आढळली.

भेसळयुक्त दूधाच्या पिशव्या ओळखा

ग्राहकांनी दूधाच्या पिशव्या व्यवस्थित सीलबंद आहेत की नाही, हे तपासून पाहावे. मूळ कंपन्यांच्या दूधाच्या सीलबंद पिशव्या कोप-याच्या बाजूने धारदार असतात. भेसळयुक्त दूधाच्या पिशव्यांमध्ये कोप-याकडचा भाग धारदार नसतो. ग्राहकांना सीलबंद दूधाच्या पिशव्यांच्या दर्जाबाबात शंका असल्यास एफडीएच्या १८०० २२२ ३६५ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.