गुणरत्न सदावर्तेंची राजकारणात एन्ट्री, नव्या संघटनेची घोषणा!

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेले वकील गुणरत्न सदावर्तेंनी राजकारणात एन्ट्री घेतली आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी रविवारी एसटी महामंडळाच्या बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात रणशिंग फुंकण्याची घोषणा केली. एसटी महामंडळाच्या बँकेवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित संघटनेची सत्ता आहे. त्यामुळे सदावर्ते हे आता एसटी महामंडळ सहकारी बँकेच्या निवडणुकीत आपलं पॅनल उभं करणार आहेत. त्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांना उमेदवारी देऊन सदावर्तेंकडून थेट राष्ट्रवादी काँग्रेस विशेषतः शरद पवारांना आव्हान देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपले पहिले पाऊल टाकले असल्याचे सांगितले जात आहे.

काय आहे नव्या संघटनेचे नाव?

मुंबईत सदावर्ते यांनी त्यांच्या नव्या संघटनेची घोषणा केली असून एसटी कष्टकरी जनसंघ असे या संघटनेचे नाव आहे. यासंदर्भात सदावर्तेंनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सदावर्ते म्हणाले, एसटी महामंडळाची बँक ही सहकाराची बँक आहे. येथे लोकशाहीच्या माध्यमातून निवडून देण्याची प्रक्रिया आहे, ती कोणाच्या बापाच्या घरची व्यवस्था नाही. कोणाला इथे भ्रष्टाचारासाठी मोकळीक दिलेली नाही. त्यामुळे कष्टकरी एसटी कर्मचारी आपली स्वतःची माणसं निवडतील.

(हेही वाचा – उद्या मीही शिवसेनेच्या जागी राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर करेन, अजितदादांचा राऊतांना इशारा)

गुणरत्न सदावर्ते 26 एप्रिल रोजी जामिनावर बाहेर पडले. त्यानंतर ते आता पुन्हा एसटीच्या कामगारांसाठी यानिमित्ताने सक्रिय झाले आहेत. एसटी बँकेचे राज्यात तब्बल 90 हजार मतदार आहेत. सध्या या बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित एसटी कामगार संघटनेची सत्ता आहे. मात्र याच संघटनेच्या विरोधात सदावर्ते यांनी रणशिंग फुंकले असून आगामी निवडणुकीमध्ये त्यांचे उमेदवार नक्कीच वेगळी जादू करतील, अशी शक्यता वर्तवली आहे.

२ हजार कोटींहून अधिक ठेवी 

गुणरत्न सदावर्ते यांनी संपात सहभागी असताना कायम आपल्या निशाण्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच ठेवले होते. शिवाय शरद पवार यांनीच एसटी कर्मचाऱ्यांचे नुकसान केले, जाणीवपूर्वक तेच विलिनीकरण टाळत असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पवार यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेताना सदावर्ते दिसणार आहेत. तब्बल दोन हजार कोटींहून अधिक ठेवी असलेल्या एसटी बँकेच्या राज्यात 50 शाखा आहेत. सध्या या बँकेचे 90 हजार सदस्य आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here