अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना आणखी एक मोठा झटका मिळाला आहे. कोल्हापूर पोलिसांना वकील गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा देण्यात आला आहे. मराठा समाजाबद्दल द्वेष निर्माण केल्याप्रकरणी कोल्हापूरमध्ये सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आता कोल्हापूर पोलिसांकडे सदावर्तेंचा ताबा देण्यात आला आहे. कोल्हापूर पोलीस सदावर्तेंच्या ताब्यासाठी सकाळी मुंबईच्या न्यायालयात हजर झाले होते. दरम्यान, सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी कोल्हापूर पोलीस मुंबईतील ऑर्थर रोज जेलकडे रवाना होणार आहे. त्यामुळे सदावर्ते यांचा प्रवास आता मुंबई टू कोल्हापूर व्हाया सातारा असा असणार असून सदावर्तेंच्या मागे पोलीस चौकशीचा ससेमिरा लागला आहे.
सदावर्तेंवर गुन्हा दाखल होण्याची मालिका सुरु
सदावर्तेंवर गुन्हा दाखल होण्याची मालिका सुरु असताना मुंबई, सातारा, कोल्हापूर, अकोल्यानंतर आता सोलापुरातही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मराठा आरक्षणाच्या निकाला संदर्भात न्यायालयाच्या निकालाचा अवमान केल्याबद्दल आणि दोन समाजात तेढ निर्माण करणारे चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी सदावर्तेंच्या विरोधात कलम १५३ अ, ब, ५००, ५०६, ५०६, ५०७ कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. छावा संघटनेचे शहराध्यक्ष योगेश पवार यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
(हेही वाचा – एसटीच्या 48 हजार संपकरी कर्मचाऱ्यांकडून घेतले पैसे; न्यायालयात सदावर्तेंची कबुली)
आता सदावर्तेंचा कोल्हापूर पोलिसांकडे ताबा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी आंदोलनप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना ८ एप्रिल रोजी मुंबईत अटक झाली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पण त्याच दरम्यान साताऱ्यात सदावर्तेंवर गुन्हा झाल्याने त्यांना सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सातारा न्यायालयाने सोमवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांना मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात आणण्यात आले आहे. बुधवारी त्यांना मुंबईतील गिरगाव न्यायालयात हजर करण्यात आले. त्याचवेळी सातारा न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. मात्र गिरगाव न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर कोल्हापूर पोलिसांना ताबा मिळाला आहे.