भायखळा येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचा पदडा तब्बल ३७ वर्षांनी उघडला. १९६३ मध्ये लावणीसह भारुड आदी लोककलांच्या सादरीकरणासाठी या खुल्या रंगमंचाचा वापर केला जात असे. परंतु राणीबागेतील प्राण्यांना या आवाजाचा त्रास होत असल्याने १९८४ मध्ये ते बंद करण्यात आले. परंतु आता तब्बल ३७ वर्षांनी हे खुले नाट्यगृह आता बंदिस्त दिमाखात उभे राहिले असून नाट्यगृहात पहिला प्रयोग पार पडला. ज्या रंगमंचावरून कधी विनोदाची हास्यजत्रा रंगत होती, कुठे लावणीच्या गाण्याने पाय थिरकत होते. पण त्याच नटून थटून उभ्या राहिलेल्या नाट्यगृहाच्या पहिल्याच प्रयोगात अनुकूल प्रतिकूलच्या संवादाची फेक होत होती. रंगमंचाचा हा ताबा मुखवट्यामागील कलाकारांऐवजी महापौर, उपमहापौर तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतला होता, तर प्रेक्षकांच्या भूमिकेत नगरसेवक होते. निमित्त होते मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे!
१९८४ पासून नाट्यगृह बंद
भायखळा येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृह हे मागील ३७ वर्षांपासून बंद आहे. १९६३ मध्ये याठिकाणी ४५० प्रेक्षकांसाठी खुले नाट्यगृह महापालिकेने सुरु केले. त्यावेळी मराठी लोककला सादर करण्यात येत होती. त्यात प्रामुख्याने लावणी आणि भारुडचा समावेश असे. परंतु १९८४ पासून हे नाट्यगृह बंद करण्यात आले तेव्हापासून २००३ पर्यंत हे नाट्यगृह पडिक स्थितीतच होते. त्यानंतर याच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव चर्चेला आला. सुरुवातीला यासाठी १३ कोटी रुपयांचा खर्च येणार होता. हा खर्च सरकार आणि महापालिका निम्मा निम्मा करणार होता. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनीही यासाठी सरकारच्या वाट्याला येणाऱ्या ५० टक्के रक्कमेत अर्थात, ६ कोटी २४ लाख रुपयांचा खर्च करण्याची तयारी दर्शवली होती. परंतु नंतरच्या कालावधीमध्ये सरकारने यासाठी निधी देण्यास नकार दिला. त्यानंतर खऱ्या अर्थाने २०१४ मध्ये प्रस्ताव तयार करण्यात आला. सुरुवातीला २० कोटी रुपयांचे काम प्रस्तावित होते, परंतु आता प्रत्यक्षात ही वास्तू उभी राही पर्यंत याचा खर्च ३५ कोटींच्या आसपास पोहोचला आहे.
( हेही वाचा : महापौरांमुळे गरीब रुग्ण औषधांपासून वंचित! वर्षभर लटकली औषध खरेदी )
महापालिकेच्या सभेने शुभारंभ
आज हे खुले नाट्यगृह बंदिस्त स्थितीत ७५० आसन क्षमतेने उभे राहिले. परंतु यामध्ये नाट्यगृहाचे अधिकृत उद्घाटन होण्याऐवजी तसेच नाटकाच्या प्रयोगाची तिसरी घंटा होण्याऐवजीच महापालिकेच्या सभेने याचा शुभारंभ करण्यात आला आहे.
सोशल डिस्टन्सिंग राखत आयोजित केलेल्या या वास्तूतील या पहिल्या सभेला सुरुवात होताच भाजपने छत्रपती शिवाजी महाराज की जय….जय शिवाजी, जय भवानी. . . अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. तर दुसरीकडे महापौरांनी कामकाजातील विषय पुकारुन त्यांना समिती अध्यक्ष तसेच अतिरिक्त आयुक्तांनी पुकारलेल्या अग्रकमानुसार मंजुरी देत सभेचे कामकाज त्या गोंधळातच पूर्ण केले. मानखुर्द येथील उड्डाणपुला छत्रपती शिवाजी महाराज पूल असे नाव देण्याच्या प्रस्तावाला अग्रक्रम देण्याच्या मागणीवरून भाजपने घोषणा बाजी करण्यास सुरुवात केली. मात्र एका बाजुला गोंधळ आणि दुसरीकडे सभेचे कामकाज सुरु होते. परंतु घोषणाबाजी आणि पाण्याचे ट्रे वाजवत एकप्रकारे या नाट्यगृहातील वास्तूला अभिप्रेत असा गोंधळ घालत भाजपने खऱ्या अर्थाने नाट्यगृहाचा मान राखला अशी मार्मिक चर्चा नाट्यगृहाबाहेर ऐकायला मिळत होती.
Join Our WhatsApp Community