अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘मुंबई श्री’ या शरीरसौष्ठव स्पर्धेच्या अंतिम फेरीचे आयोजन शनिवारी संध्याकाळी अंधेरी पश्चिम परिसरातील मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील आणि बृहन्मुंबई क्रीडा व ललित कला प्रतिष्ठान संचालित शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलात होत आहे. विशेष म्हणजे तीन वर्षाच्या कालखंडानंतर आयोजित होत असलेल्या या स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी ०१ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजेपासून होणार असून या स्पर्धेत अनेक शरीरसौष्ठव-पटू आपले पिळदार आणि कसलेले आविष्कार सादर करणार आहेत. तर त्यानंतर विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके दिली जाणार आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गोडसे यांनी दिली आहे.
( हेही वाचा : परराष्ट्र व्यापार धोरण 2023 जाहीर; 2030 पर्यंत भारताची निर्यात 2 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत होणार)
याबाबत अधिक माहिती देताना प्रतिष्ठान द्वारे कळविण्यात आले आहे की, शनिवारी सायंकाळी होणाऱ्या अंतिम फेरीदरम्यान मुख्य शरीरसौष्ठव स्पर्धा, महिलांची शरीरसौष्ठव स्पर्धा आणि फिजीक स्पोर्ट्सच्या दोन गटांतील पोझ युद्धाची अंतिम फेरी चाचणी देखील रंगणार आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड होणारे क्रीडापटू शनिवारी सायंकाळी आपले पीळदार शरीर दर्शवित ही स्पर्धा अधिक चुरशीची करणार आहेत.
तीन वर्षांनी होत असलेल्या या सोहळ्यात शरीरसौष्ठवपटूंना पदकांसह रोख पुरस्कार दिले जाणार असल्याचे शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अमोल कीर्तिकर यांनी कळविले आहे. काही लाखांची रोख बक्षिसे आणि सर्वांना आपल्या प्रेमात पाडणारा भव्यदिव्य चषक हा ‘मुंबई श्री’चे आकर्षण असण्यासोबतच ‘मिस मुंबई’ स्पर्धासुद्धा होणार असल्याचेही बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी कळविले आहे.
Join Our WhatsApp Community