उत्तर प्रदेशची निवडणूक आणि मुंबईतील घटती रुग्ण संख्या! काय आहे कनेक्शन?

मुंबईत मागील काही दिवसांपासून वाढलेल्या कोविड रुग्णांची आकडेवारी आता खाली सरकताना दिसत असून मंगळवारी दिवसभरात ११ हजार ६४७ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी कोविड रुग्णांची आकडेवारी खाली घसरताना दिसत आहे. महापालिकेच्या निवडणुकीचे भवितव्य हे उत्तर प्रदेशच्या निवडणूक कार्यक्रमावर अवंलबून असल्याची चर्चा बोलली जात असतानाच या निवडणुका ज्या दिवशी जाहीर झाल्या तेव्हापासून रुग्णांचा आकडा कमी कमी होताना दिसत असल्याने नक्की हा योगायोग म्हणायचा का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

( हेही वाचा : गटविमा नाहीच, वैयक्तिक आरोग्य विमाच घ्या! ना १५ हजार, ना २० हजार, बारा हजारच देणार )

मुंबईत सोमवारी जिथे ५९ हजार २४२ लोकांच्या चाचणी केल्यानंतर १३ हजार ६४८ नवीन रुग्ण आढळून आले होते, तिथे मंगळवारी ६२ हजार ०९७ चाचण्या केल्यानंतर ११ हजार ६४७ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर यापैकी ९ हजार ६६७ रुग्ण हे लक्षणे नसलेले असून दिवसभरात यापैकी ८५१ रुग्णांना रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. यातील ७६ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली होती. मुंबईतील विविध कोविड सेंटर आणि रुग्णालयांमध्ये एकूण ७ हजार २८३ रुणांना दाखल करण्यात आले असून एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ५२३ एवढी झाली आहे. दिवसभरात १४ हजार ९८० रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर दिवसभरात २ जणांचा मृत्यू झाला होता.

कोविडमुक्त झोपडपट्टया

मुंबईतील कोविडमुक्त असलेल्या झोपडपट्टयांना पुन्हा एकदा कोरोनाने विळखा घातल्यानंतर सक्रिय कंटेन्मेंट झोन असलेल्या चाळी व झोपडपट्टयांची संख्या ३०च्या वर जावून पोहोचली होती. परंतु या सर्व झोपडपट्टी व चाळींनी शुन्याची किमया साधत आपल्या वस्त्या कोविडमुक्त बनवल्या आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ही ६३ एवढी होती.

निवडणुका जाहीर झाल्यानंतर रुग्ण संख्या झपाट्याने खाली

मुंबई महापालिकेची २०२२ ची सार्वत्रिक निवडणूक ही फेब्रुवारीपर्यंत होणे अपेक्षित असताना काही दिवस पुन्हा लांबणीवर पडली जाण्याची शक्यता आहे. कोविडच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक पुन्हा ढकलली जाण्याची शक्यता होती. परंतु राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांच्या म्हणण्यानुसार उत्तर प्रदेशची निवडणूक होईपर्यंत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर होऊ नये, अशी इच्छा होती. त्यामुळे उत्तर प्रदेशची निवडणूक जाहीर होत नाही तोवर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना दिसत होता. परंतु शनिवारी मध्य प्रदेशच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर २० हजारांवर स्थिरावलेली रुग्णसंख्या झपाट्याने खाली आलेली पहायला येत आहे. त्यामुळे २० हजारांपर्यंत गेलेली ही रुग्णसंख्या तीन दिवसांमध्ये चाचण्यांचे प्रमाण तेवढ्या प्रमाणात असूनही ११ हजारांपर्यंत आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

( हेही वाचा : मालाडच्या जंबो कोविड सेंटरला फायर एनओसीच नाही! )

( हेही वाचा : पालिकेची विक्रमी कामगिरी! कोस्टल रोडच्या पहिल्या बोगद्याचे खोदकाम पूर्ण )

वाढत जाणारी रुग्ण संख्या उत्तर प्रदेशच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच कशी कमी होऊ लागली असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडू लागला आहे. महाविकास आघाडीतील पक्षांना महापालिकेची निवडणूक लांबणीवर टाकण्यासाठी, ही संख्या तर वाढवली जात नव्हती ना, असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी “रुग्णांची ही संख्या वाढवलेली आणि फुगवलेली होती हे जनतेला कळत होते. परंतु ज्याप्रकारे ही संख्या वाढली जात होती आणि त्यानंतर लॉकडाऊनची भीती दाखवली जात होती, त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला आणि त्यांनाच हे लॉकडाऊन लागू होणार नाही हे सांगावे लागले. परंतु ही जी संख्या कमी झाली आहे, त्याला उत्तर प्रदेशच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याचा मुहूर्त कसा सापडला हा थोडा संशोधनाचा भाग आहे. याला निव्वळ योगायोग समजावा की अन्य काय असाही सवाल करत उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची वाट पाहण्याची वेळ राज्यातील सरकार आणि महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर आल्याने यातून त्यांना निवडणुकीची किती भीती वाटते हे स्पष्ट होते,” असे ते म्हणाले.

रुग्णसंख्या आकडा 

 • ११ जानेवारी २०२२ : बाधित रुग्ण – ११ हजार ६४७
 • १० जानेवारी : बाधित रुग्ण – १३ हजार ६४८
 • ०९ जानेवारी : बाधित रुग्ण – १९ हजार ४७८
 • ०८ जानेवारी : बाधित रुग्ण – २० हजार ३१८
 • ०७ जानेवारी : बाधित रुग्ण – २० हजार ९७१
 • ०६ जानेवारी : बाधित रुग्ण – २० हजार १८१
 • ०५ जानेवारी : बाधित रुग्ण – १५ हजार १६६
 • ०४ जानेवारी : बाधित रुग्ण – ८ हजार ०८२
 • ०२ जानेवारी : बाधित रुग्ण – ८ हजार ०६३
 • १ जानेवारी : बाधित रुग्ण – ६ हजार ३४७
 • ३१ डिसेंबर २०२१ : बाधित रुग्ण – ५ हजार ६३१
 • ३० डिसेंबर २०२१ : बाधित रुग्ण – ३ हजार ६७१

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here