न्यायासाठी एका पित्याची धडपड…

85

तरुण मुलाने राहत्या घराच्या गच्चीवर गळफास लावून आत्महत्या केल्यानंतर त्याच्या मृत्यूला जे जबाबदार असतील, त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात करावा, यासाठी त्या तरुणाच्या पित्याने थेट मुंबई पोलिस आयुक्त यांना पत्र पाठवून ‘ माझ्या मुलाला न्याय देण्यात यावा’, अशी मागणी पत्रात केली आहे.

प्रकाश ललवाणी असे या पित्याचे नाव आहे. प्रकाश ललवाणी यांचे चेंबूर परिसरात सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे दुकान होते. त्यानंतर त्यांनी हे दुकान खारघर येथे सुरू केले. देवनार येथील ग्रीन एकर्समध्ये राहणारे प्रकाश ललवाणी यांना दोन मुले होते. त्यापैकी मानव (२४) या मुलाने २ डिसेंबर रोजी रात्री घराच्या गच्चीवर जाऊन आत्महत्या केली होती. मानव हा २ डिसेंबर रोजी मित्र-मैत्रिणी यांच्यासोबत पार्टी करून घरी आला होता. मानवने घरी आल्यावर एवढे टोकाचे पाऊल का उचलले, हे कुणाच्याच लक्षात आले नाही. घरात कुणाशी वाद झाला नव्हता किंवा त्याला इतर कसलीही चिंता नव्हती. मग त्याने अचानक एवढी टोकाची भूमिका का घेतली असावी, म्हणून वडील प्रकाश यांनी मित्र मैत्रिणीकडे चौकशी केली असता मानव रात्री आमच्यासोबत होता, त्यानंतर त्याने मैत्रिणीला घरी सोडले, ही माहिती मानवच्या मित्रांनी दिली.

(हेही वाचा जॅकलिनला ५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर आणि बरंच काही..)

छताला दोरी बांधून फास लावून आत्महत्या 

त्यानंतर वडिलांनी गच्चीवर असलेला सीसीटीव्ही कॅमेरा तपासला असता मानव हा सतत मोबाईल फोनवर बोलताना दिसत होता. तसेच तो मोबाईलवरून कुणाला तरी सतत मेसेज पाठवत असल्याचे दिसले, त्यानंतर त्याने गच्चीवर असलेल्या छताला दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केल्याचे कॅमेरात दिसले, अशी माहिती वडील प्रकाश ललवाणी यांनी दिली. ललवाणी यांनी याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात तक्रार केली की, माझा मुलगा रात्री कुणासोबत तरी फोनवर बोलत होता, त्यानंतर त्याने गळफास घेतला, माझ्या मुलाच्या मृत्यूला फोनवर बोलणारी व्यक्ती जबाबदार असल्याचे त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले. मात्र ट्रॉम्बे पोलिस काहीच कारवाई करीत नसल्याचे बघून ललवाणी यांनी थेट मुंबई पोलिस आयुक्त यांना पत्र लिहून न्याय मागितला आहे. हे पत्र ललवाणी यांनी आयुक्तांना ईमेल द्वारे पाठवले आहे.

मैत्रिणीसह बाहेर जेवणासाठी गेला होता

याबाबत ट्रॉम्बे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिद्धेस्वर गोवे यांच्याकडे चौकशी केली असता मानव ललवाणी हा तरुण २ डिसेंबर रोजी मैत्रिणीसह बाहेर जेवणासाठी गेला होता, त्यावेळी त्याच्यासोबत आणखी एक तरुण होता, मानवची मैत्रीण सतत त्या तरुणासोबत बोलते म्हणून मानवला राग आला व त्याने दारूच्या नशेत मैत्रिणीला ‘माझ्याशिवाय इतर तरुणासोबत बोलायचे नाही’, असे खडसावले होते. त्यानंतर त्याने मैत्रिणीला घरी सोडले आणि तो रात्री दीडच्या सुमारास घरी आला. तेव्हाही तो सतत मैत्रिसोबत चॅट करीत होता, त्याने मैत्रिणीला फोन लावले, परंतु मैत्रिणीने फोन सायलेंटवर ठेवून झोपी गेली होती. त्या दरम्यान मानवने तिला बरेच फोन केले, मात्र मैत्रीण फोन उचलत नसल्याचे बघून त्याने नैराश्याच्या भरात आत्महत्या केली, अशी माहिती गोवे यांनी दिली. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी अपमृत्युची नोंद केली असून तपास सुरू असल्याचे सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.