आरेतील ८१२ हेक्टर जागा जंगल म्हणून घोषित झाल्यानंतर शनिवारी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आरेतील अजून काही भूभाग जंगलाशी जोडला जाणार असल्याचे घोषित केले. परंतु महाविकास आघाडीने आरेतील संपूर्ण जंगल भागांतून विकास प्रकल्प तसेच अतिक्रमणे हटवून टाका, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली. मेट्रो ३ कारशेड प्रकरणात महाविकास आघाडीने ठोस भूमिका जाहीर करावी, या मागणीसाठी रविवारी सकाळी आरेतील पिकनिक पोईंट येथे पर्यावरणप्रेमी जमले होते. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी भेटून पर्यावरणप्रेमींस्या समस्या जाणून घ्याव्यात, अशी मागणीही यावेळी केली गेली.
पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली नाराजी
राज्यातील गेल्या सत्ताधा-यांनी आरेतच मेट्रो ३ च्या कारशेड उभारणीचा हट्ट धरल्यानंतर कारशेड हटवण्यासाठी सुरु झालेल्या मागणीला शिवसेनेने व्यापक पाठिंबा दर्शवला. गेली दोन वर्षे सत्ता स्थापनेनंतर अद्यापही कांजूरमार्गमध्ये मेट्रो ३ चे कारशेड उभारले गेलेले नाही, त्यासह आरेतील जागेत आता विविध बांधकामे सुरु झाली आहेत. याबाबत पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली.
(हेही वाचा – चिंता नाही! आता २४ तास ‘या’ रूग्णालयात राहणार रूग्ण सेवा सुरू)
विविध विकासकामांना पर्यावरणप्रेमींनी विरोध
आरे जंगल वाचवा ही प्रमुख मागणी करत आरेतील विविध विकासकामांना पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शवला.
- संपूर्ण आरेचा भूभाग जंगल म्हणून घोषित करा, आरेला विकासकामांपासून दूर ठेवा.
- शनिवारी मध्यरात्री वनीचा पाडा या भागांत वणवा लागला, हा वणवा मानवनिर्मित असल्याचा आरोप आरे जंगल वाचवा मोहिमेचे सदस्य मोहम्मद शेख यांनी केला. या वणव्यात १ हेक्टर जमीन जळून खाक झाली. मुंबईतील हवामानात आरेत नैसर्गिक वणवे लागण्याची शक्यता नसताना या भागांत वणव्यामुळे खाक झालेल्या जमिनीत नव्या अतिक्रमणग्रस्त झोपड्या उभारल्या जातील, अशी भीती मोहम्मद शेख यांनी व्यक्त केली.
- आरेत झोपडपट्टी पुनर्वसन योजना आणू नका, आरे हे जंगलच राहून दे, अशी मागणी ‘इंडिया ग्रीन्स पार्टी’च्या अर्चना पटेल यांनी केली. आरेत आरटीओची उभारणीही नको.
- आरेतील मेट्रो ३ कारशेड उभारणीतील पत्रे व इतर बांधकामे तातडीने हटवा, अशी मागणी आरे जंगल वाचवा शिवानी भट यांनी केली.
- आरेत रस्ता उभारणीचे काम नको. इथल्या वन्यप्राण्यांच्या अधिवासाला बाधा येईल, असे कोणतेही काम आरेत होता कामा नये. आरेतील रहिवाशांना ओळखपत्र द्या. जेणेकरुन त्यांना आरेतील संचारात अडथळा निर्माण होणार नाही.
- आरेत अत्यावश्यक कामे वगळता सायंकाळनंतर कोणत्याही वाहनाला जाण्याची परवानगी देऊ नये. वाहनांच्या हालचाली कमी होण्यासाठी टोलआकारणी बंधनकारक असावी, अशी मागणी ‘वी द पीपल’ या संस्थेच्या प्रशांत मणकेश्वर यांनी केली.
- मागील डीपीच्या रचनेप्रमाणे सुरु असलेली आरेतील कामे तातडीने थांबवावी, अशी मागणी आरे जंगल वाचवा मनजीत यांनी केली.