होळीच्या सुट्टीनंतर कर्नाटक हिजाब वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. होळीनंतर या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख निश्चित करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. तर मंगळवारी उच्च न्यायालयाने कर्नाटकातील हिजाब वादावर आपला निर्णय दिला होता, त्यात न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबला परवानगी देता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. आता कर्नाटक उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात अनेक विद्यार्थिनींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत.
दरम्यान, विद्यार्थिनींची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील संजय हेगडे यांनी सोमवारीच या प्रकरणाची सुनावणी घेण्याची मागणी केली. त्यावर उत्तर देताना सरन्यायाधीश म्हणाले की, या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख होळीनंतर निश्चित केली जाणार, असल्याचे सांगितले जात आहे.
काय दिला उच्च न्यायालयाने निर्णय?
कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी उडुपी येथील ‘गव्हर्नमेंट प्री-युनिव्हर्सिटी गर्ल्स कॉलेज’च्या मुस्लिम विद्यार्थिनींच्या वर्गात हिजाब घालण्याची परवानगी मागणारी याचिका फेटाळून लावली आणि असे म्हणत हिजाब हा इस्लामिक धर्माचा अनिवार्य भाग नसल्याचे सांगितले आहे. यासोबत शैक्षणिक संस्थांमध्ये पूर्णतः हिजाब बंदी योग्यच असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. यावेळी तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सांगितले की, शालेय गणवेशाचा नियम हा वाजवी निर्बंध आहे आणि तो घटनात्मकदृष्ट्या मान्य आहे, ज्यावर विद्यार्थिनी कोणताही आक्षेप घेऊ शकत नाहीत.
(हेही वाचा –इलेक्ट्रिक वाहन घेताय? मग तुमच्यासाठी ‘ही’ आहे खुशखबर!)
काही दिवसांपूर्वी कर्नाटकात हिजाबच्या वादावरून बराच गदारोळ झाला होता, ज्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम संघटना आमने-सामने आल्या होत्या. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. तर दुसरीकडे याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयाचा आदेश ‘असंवैधानिक’ असल्याचे सांगत आपली कायदेशीर लढाई सुरूच राहणार असल्याचे सांगितले.
Join Our WhatsApp Community