काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी निषेध व्यक्त केला आहे. राज्यासह देशभरातील काँग्रेस नेत्यांनी ट्विटर हे मोदी सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचे म्हटले आहे. तसेच याबाबत ट्विटरचा निषेध करण्यासाठी आता काँग्रेस नेत्यांनी एक आगळीवेगळी मोहीम सुरू केली आहे. देशभरातील अनेक काँग्रेस नेत्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटला राहुल गांधी यांचे नाव दिले आहे. तसेच प्रोफाईलला त्यांचा फोटोही ठेवला आहे. तसेच मोदी सरकारच्या ताटाखालचे मांजर झालेल्या ट्विटरविरोधात आपला लढा चालूच राहील, असे देखील काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
आपले ट्विटर अकाऊंट निलंबित केल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विटरवर आगपखड केली आहे. ट्विटर लोकशाहीवर घाला घालण्याचा प्रयत्न करत आहे. फक्त माझाच नाही तर देशातील करोडो लोकांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे. एक कंपनी आता देशाच्या राजकारणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहे. यावरुन हे सिद्ध होते की ट्विटर निःपक्षपातीपणे काम करत नाही. एका पक्षाची बाजू घेऊन लोकांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न आहे. असे त्यांनी म्हटले आहे.
प्रियंका गांधींची टीका
राहुल गांधी यांच्यासह अनेक काँग्रेसच्या काही नेत्यांचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आल्यानंतर, काँग्रेस नेत्यांनी ट्विटर विरोधात संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस नेत्या आणि राहुल गांधींच्या भगिनी प्रियंका गांधी यांनीही आपल्या ट्विटर प्रोफाईलवर राहुल गांधींचे नाव आणि फोटो ठेवत, ट्विटरचा निषेध केला आहे. ट्विटर आपल्या स्वतःच्या धोरणांनुसार काम करत आहे की, मोदी सरकारच्या असा प्रश्न विचारत प्रियंका गांधी यांनी ट्वीट केले आहे. काँग्रेस नेत्यांचे अकाऊंट बंद करुन ट्विटर भारतातील मोदी सरकारद्वारे लोकशाहीचे खच्चीकरण करत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
By locking Congress leaders' accounts en masse, Twitter is blatantly colluding with the stifling of democracy by the BJP government in India. 2/2
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) August 12, 2021
का केले राहुल गांधीचे अकाऊंट निलंबित?
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मागील आठवड्यात दिल्लीत झालेला बलात्कार आणि हत्या झालेल्या पीडितेच्या कुटुंबियांसोबतचे फोटो ट्वीट केले होते. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) याप्रकरणी पॉस्को कायद्याच्या उल्लंघनाचा दाखला देत, राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्याचे ट्विटरला निर्देश दिले होते. राहुल गांधी यांनी पीडित मुलीच्या आई-वडिलांसोबत फोटो ट्वीट केला होता. त्यामुळे त्यांचे अकाऊंट अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे.
काँग्रेस नेत्यांनी ठेवले राहुल गांधींचे नाव
केंद्रातील मोदी सरकारला जाब विचारणारे ट्विट करून जेरीस आणल्यामुळेच मोदी सरकारच्या दबावाखाली ट्विटरने ही कारवाई केली आहे. या कारवाईचा काँग्रेस पक्ष निषेध करत असून, कोणत्याही दबावापुढे न झुकता लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्ष आवाज उठवतच राहील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
जेव्हा आमच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले, तेव्हा आम्ही घाबरलो नाही. मग आम्ही आता ट्विटर खाती बंद करत आहे तर का घाबरू? आम्ही काँग्रेस आहोत, हा जनतेचा संदेश आहे, आम्ही लढू आणि लढत राहू, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.
बलात्कार पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवणे हा जर गुन्हा असेल, तर आम्ही हा गुन्हा 100 वेळा करू.” जय हिंद, सत्यमेव जयते., असे काँग्रेसने म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community