मुंबईच्या अंधेरी या ठिकाणी असलेल्या दीपा बारमधील छापेमारीनंतर मुंबई पोलिसांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील प्रत्येक डांस बार आणि लेडीज सर्व्हिस बारचे मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याकडून ऑडिट करून घेण्यात यावे, अशी तोंडी सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्येक पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना दिली आहे. मागील काही दिवसांपासून बार ऑडिटचे काम सुरू करण्यात आले असून अंधेरीतच दोन बारमध्ये छुप्या जागा मिळून आलेल्या असून या बार मालकावर बेकायदेशीर बांधकाम केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
बारमध्ये २० डान्सर मुली होत्या
अंधेरी पूर्वेतील दीपा डांस बारवर दोन आठवड्यापूर्वी करण्यात आलेल्या कारवाईत धक्कादायक प्रकार समोर आला होता. बारमध्ये चार मुली ठेवण्याचा परवाना असताना बार मालकाने चक्क २० डान्सर मुली ठेवून सरकारी नियमाचे उल्लंघन केल्याचे समोर आले होते. या मुलींना लपवून ठेवण्यासाठी बार मालकाने छुप्या जागा तयार करून त्यात मुलींना लपविण्यात आले होते, हे मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेच्या धाडीत समोर आले होते. दीपा बारच्या छुप्या जागेतून एवढ्या मोठ्या प्रमाणात बार डान्सरला बाहेर काढण्यात येत असल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात समाज माध्यमावर व्हायरल झाला होता. त्यानंतर मुंबई पोलिस विभागाचे सह पोलिस आयुक्त (कावसु) विश्वास नांगरे पाटील यांनी गंभीर दखल घेत मुंबईतील सर्व पोलिस ठाण्यांना तंबी देत प्रत्येक वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी आपल्या हद्दीतील डांस बार, लेडीज बार यांची यादी तयार करून मुंबई महानगर पालिकेच्या प्रत्येक वार्ड अधिकारी यांच्याकडून दिवसा बारची तपासणी करून घ्यावी, असे तोंडी आदेश देण्यात आले होते.
(हेही वाचा नितेश राणे कुठे आहेत? कणकवली पोलिसांची नारायण राणेंना नोटीस)
अंधेरीतील 2 बारला नोटीस
या तपासणीची सुरुवात अंधेरी पोलिस ठाण्यापासून करण्यात आली असता अंधेरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या उर्वशी आणि पिंक व्हीला या दोन बारमध्ये बारबालाना लपवण्यासाठी छुप्या जागा तयार करण्यात आलेल्या होत्या. मुंबई महानगर पालिकेकडून या दोन्ही बारचे छुप्या जागेवर कारवाई करीत बार मालकांना अनधिकृत बांधकाम केल्या प्रकरणी नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत. मुंबईतील सर्व डांस बार आणि लेडीज बार ची यादी संबंधित पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाकडून यांनी तयार करण्यात आली असून ती यादी संबंधित मनपाच्या वार्ड अधिकारी यांना देण्यात येत आहे. या यादीप्रमाणे मुंबईतील डांस बार आणि लेडीज बारचे ऑडिट करण्यात येत आहे. वरिष्ठांकडून हे आदेश तोंडी देण्यात आले असल्याची माहिती मुंबईतील काही पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community