ब्रिटीशकाळात वाढत्या शिकारीमुळे कोकण आणि कोल्हापूर पट्ट्यातील वाघांचे अस्तित्व संपले. कित्येक वर्षांनी ८ वाघांची दक्षिण कोकण आणि कोल्हापूर राज्यातील संरक्षित क्षेत्रात ये-जा सुरु झाली आहे. कोकण आणि कोल्हापूरात वाघांचे अस्तित्व पुन्हा अधोरेखित होत असताना कोल्हापूरातील पाच बॉक्साइड खाणकाम बांधकामांना तत्वतः वनविभागाने मंजूरी दिली आहे.
संवर्धित क्षेत्राला लागून असलेल्या कोल्हापूरातील ६० हेक्टर जागा खाणकामांसाठी दिली जाईल. बांधकामांना सुरुवात झाल्यास वाघांना कोकण,कोल्हापूर पार करत थेट सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा प्रदेश गाठणे अवघडच असल्याची खंत वन्यजीव प्रेमी व्यक्त करत आहेत. प्राचीन कालापासून वाघांचा हा भ्रमणमार्ग पुन्हा सुरु होण्यासाठी या भागांत बांधकामांना बंदी यावी, ही आग्रही मागणी वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केली.
(हेही वाचा – नवरात्रोत्सवात १ ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट)
दोन वर्षांपासून कोल्हापूर आणि कोकण पट्ट्यातील खाणकामांच्या व्यवसायांमुळे या भागांतील जैवविविधता धोक्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या खाणकामांच्या मंजुरींना आळा मिळावा म्हणूनच वनविभागातील काही वरिष्ठ अधिका-यांनी, राज्य वन्यजीव बोर्डातील अधिका-यांनी या पट्ट्यातील राखीव वन्यजीव क्षेत्रे जाहीर करण्याचा सपाटा लावला होता. आगामी मनुष्यबळ तसेच इतर संवर्धनात्मक योजनांवरही कामकाज सुरु केले होते. एका बाजूला संरक्षित क्षेत्रे तर दूसरीकडे बॉक्साइड खाणकामांचे क्षेत्र लागूनच असल्याने मानवी हस्तक्षेप वाढू लागेल.
परिणामी, वाघांचा वावर कमी होण्याची भीती सातारा वनविभाग (प्रादेशिक)चे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी व्यक्त केली. मंजुरी मिळालेल्या जागेत रानगवे, बिबट्या, चौशिंगा, वाघाटी, खवल्या मांजर तसेच इतर तृणभक्षक प्राण्यांचे अस्तित्व दिसून येते. शिवाय या प्रस्तावित भागांत नैसर्गिक जलसाठ्यांतून कोल्हापूरवायींना पाणी मिळते. बॉक्साइडचे खाणकाम सुरु झाल्यास नैसर्गिक जलसाठ्यातील पाण्याची गुणवत्ता दूषित होईल. हवेची गुणवत्ता ढासळल्यास जल आणि वायू प्रदूषणाचे दूरगामी परिणाम पशु-पक्ष्यांवर आणि मानवी समूहावर दिसून येतील. वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोलीत पोहोचण्यासाठी या खाणकामांमुळे मोठी बाधा निर्माण होण्याची भीती आहे.
Join Our WhatsApp Community