शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत आणि इतर अनेक लहान नेत्यांची आर्थिक स्थिती अनेक पटींनी वाढल्याचे, आत्तापर्यंत केलेल्या तपासात समोर आल्याचे अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने सोमवारी न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रात म्हटले आहे. ईडीने सादर केलेल्या कागदपत्रातील हे लहान नेते नक्की कोण आहेत. कोणाच्या आशीर्वादामुळे त्यांची आर्थिक स्थिती कित्येक पटीने वाढली याचा तपास सुरू आहे. दरम्यान मंगळवारी ईडीने या घोटाळ्यासंबंधित दोन ठिकाणी सर्च ऑपरेशन करून काहींना समन्स बजावले आहे. हे समन्स कुणाला बजावले याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे.
ईडीच्या तपासात काय?
गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांना अटक केल्यानंतर ईडीने सोमवारी संजय राऊत यांना पीएमएलए न्यायालयात हजर केले होते. या दरम्यान ईडीने न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रात राऊत यांच्यावर प्रवीण राऊत यांच्यासोबत झालेल्या आर्थिक व्यवहाराबाबतची माहिती देण्यात आली आहे. तसेच संजय राऊत यांना प्रवीण राऊत यांच्याकडून अतिरिक्त रोख रक्कम मिळाली, गुन्ह्यातील रक्कम रोख रकमेच्या स्वरुपात संजय राऊत यांनी खिम, अलिबाग येथे जमीन खरेदीसाठी मालमत्ता संपादन करण्यासाठी वापरली होती, तसेच संजय राऊत आणि इतर अनेक लहान नेत्यांची आर्थिक स्थिती अनेक पटींनी वाढल्याचे, आत्तापर्यंत केलेल्या तपासात समोर आले असल्याचे, ईडीने न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रात म्हटले आहे.
( हेही वाचा: श्रावण सुरु होताच भाज्यांचे दर कडाडले! )
हे नेते कोण आहेत, ज्यांची आर्थिक स्थिती अनेक पटीने वाढली याबाबत ईडीकडून गुप्तता पाळण्यात आली आहे. दरम्यान मंगळवारी ईडीने काही ठिकाणी सर्च ऑपरेशन (शोध मोहीम) सुरू केले, तसेच काहींना समन्सदेखील देण्यात आले असल्याचे समजते. ईडीच्या या कारवाईमुळे संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.