चंद्रपूरातील सहा हत्तींची गुजरातेत पाठवणी केल्यानंतर आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बजरंग आणि दुर्गा या वाघाची जोडी गुजरात वनविभागाला दिली जाणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून गुजरातचे सिंह मिळवण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडून कसोशीने प्रयत्न सुरु आहे. परंतु दोन्ही वाघ दत्तक वन्यप्राणी योजनेतून दत्तक घेतले असल्याने वाघांच्या वार्षिक योजनेतील दत्तक रक्कमेचाही प्रश्न उभा राहिला आहे.
पर्यटकांकडून महसूल गोळा करण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली
बजरंग (६ वर्ष) आणि दुर्गा (अडीच वर्ष) वाघ-वाघीण विदर्भातूनच उद्यानाने गेल्या अडीच वर्षांत आणले. उद्यानातील वाघांची संख्याही प्रजननाच्या माध्यमातून वाढवण्याचा वनाधिका-यांची योजना आहे. २०११ सालानंतर उद्यानात एकाही वाघ किंवा सिंहाचा जन्म झालेला नाही. दोन सिंह आणि सहा वाघांमध्ये पर्यटकांकडून महसूल गोळा करण्यासाठी उद्यान प्रशासनाच्या हालचाली सुरु आहेत. उद्यानात पिंज-यात बंदिस्त वन्यप्राणी वन्यप्राणी दत्तक योजनेंतर्गत वर्षभरासाठी वन्यप्रेमींना दत्तक घेता येतात. त्यांच्या जेवणाचा खर्च आणि आठवड्यातून एकदा भेटण्याची परवानगी उद्यान प्रशासन देते.
(हेही वाचा – हिंदूंना बंदुका चालवण्याचं प्रशिक्षण सरकारने द्यावं; मनसेची मागणी)
कोरोना काळात मोठ्या प्रमाणात पर्यटकांकडून बुडालेला महसूल पाहता ही योजना पुन्हा नव्याने कार्यान्वित करण्यात आली. योजनेला प्राणीप्रेमींनीही भरभरून प्रतिसाद दिला. गुजरातकडून एका सिंहाच्या जोडीच्या मागणीसाठी सहापैकी बजरंग आणि दुर्गा या वाघांच्या जोडीबाबत निवेदन पत्र गुजरात वनविभागाला दोन आठवड्यांपूर्वी मिळाले. पत्राची पुष्टीही गुजरात वनविभागाने ‘हिंदुस्थान पोस्ट’कडे केली. मात्र वाघ निवडीचा अंतिम निर्णय आमचाच राहील, अशी स्पष्टोक्ती गुजरात वनविभागाच्या वनाधिका-यांनी केली.
पाठवणी होणा-या वाघ-वाघीणींच्या दत्तक योजनेबद्दल
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वर्षभरासाठी वाघ दत्तक घ्यायचे असल्यास तीन लाख १० हजारांचा खर्च येतो. धर्मराज फाऊंडेशनकडून १८ ऑगस्ट २०२१ रोजी बजरंगला दत्तक घेतले गेले. हा दत्तक वार्षिक काळ येत्या ऑगस्ट रोजी संपुष्टात येईल. बजरंगसह दुर्गाही त्याच दिवशी दत्तक घेतली गेली. सीतादेवी बाबुराव फाऊंडेशनकडून तिला दत्तक घेण्यात आले.
पाठवणीची प्रक्रिया संथगतीने…
गुजरात आणि महाराष्ट्र वनविभागात आपापासांत प्राणी पाठवण्याबाबत अद्यापही लेखीच काम सुरु आहे. प्रत्यक्षात दोन्ही वाघ पाठवायला बराच काळ लोटणार, तोपर्यंत दत्तक वन्यप्राणी योजनेचा काळ संपेल, असा उद्यान प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्याअगोदर वाघांची पाठवणी करायचा निर्णय झाल्यास आम्ही संबंधितांना नुकसानभरपाई देऊ किंवा अन्य उपायांबाबत दत्तक प्राणी योजनेशी संबंधित समितीशी चर्चा करुन ठरवू, असे उद्यानाचे वनसंरक्षक व संचालक जी. मल्लिकार्जून यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community