एनआयए पाठोपाठ मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाऊद टोळीच्या विरोधात मोहीम हाती घेतली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने कुख्यात गुंड छोटा शकीलचा साडू सलीम फ्रुट आणि रियाज भाटीच्या अटकेनंतर सोमवारी रात्री दाऊद टोळीशी संबंधित ५ जणांना अटक करण्यात आली आहे. या पाच जणांना खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान या प्रकरणात खंडणी विरोधी पथकाने सोमवारी आणखी पाच जणांना अटक केली आहे. अजय गोसारिया, फीरोज चमडा, समीर खान, अमजद रेडकर आणि एक जण असे अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. हे पाच जण दाऊद टोळीशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. या पाच जणांना आज, मंगळवारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे
(हेही वाचा – PFI नंतर NIA चा काश्मिरमध्ये मोर्चा, टेरर फंडिंग प्रकरणी अनेक ठिकाणांवर छापे)
खंडणी विरोधी पथकाने काही आठवड्यापूर्वी गोरेगाव येथील एका बांधकाम व्यवसायिकाच्या तक्रारीवरून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा जवळचा साथीदार कुख्यात गुंड छोटा शकीलचा साडू सलीम शेख उर्फ सलीम फ्रुट आणि रियाज भाटी यांच्याविरुद्ध खंडणी विरोधी पथकाने खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने रियाज भाटी याला अटक केली होती, तसेच गेल्या आठवड्यात खंडणी विरोधी पथकाने एनआयएच्या अटकेत असलेला सलीम फ्रुट याचा ताबा घेऊन त्याला या प्रकरणात अटक केली.