एसटीचीही इलेक्ट्रिक वारी! सुरू होणार ‘ई-शिवनेरी’चा प्रवास

पुण्यातून ई-शिवनेरीचा प्रवास लवकरच सुरु होणार

140

एसटी महामंडळातील लालपरी, शिवशाही, शिवनेरी, हिरकणी, विठाई यासारख्या बसेसच्या परिवारात आता आगळी-वेगळी नवख्या रूपातील लालपरी नव्या रंगात प्रवाशांच्या सेवेत गेल्या काही दिवसांपूर्वी दाखल झाली. राज्यात ज्या मार्गावर पहिली एसटी महामंडळाची बस धावली होती त्याच मार्गावर म्हणजे पुणे-अहमदनगर मार्गावर पहिली इलेक्ट्रिक एसटी बसची सेवा सुरू झाली. राज्य परिवहन महामंडळाची पहिली ई-बस शिवाई पुण्यातून धावल्यानंतर आता ई-शिवनेरीचा प्रवास लवकरच सुरु होणार आहे. त्यामुळे पुणेकरांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

(हेही वाचा – ‘लालपरी’ अशी ओळख असलेल्या ‘एसटी’चा ‘कलरफूल’ प्रवास!)

कुठे धावणार ई-शिवनेरी?

पुणे विभागाला ९६ ई-शिवनेरी बस मिळणार आहेत. त्यासाठी नव्या चार्जिंग स्टेशनचे काम सुरु झाले आहे. पुण्याहून ई-शिवनेरी दादर, परळ, ठाणे व बोरिवली या ठिकाणी धावणार आहे. यासाठी पुण्यातील चार्जिंग स्टेशनमध्ये १७ चार्जर उभारले जाणार आहे. पुणे-नगर ई-शिवाई बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे लक्षात घेता एसटी प्रशासन आता ई-शिवनेरी बसेस सुरु करणार आहेत. त्यासाठी ओलेक्ट्रा कंपनीच्या बसेस वापरल्या जाणार आहे. त्यासाठी हैदराबाद येथे बसेसची निर्मितीही सुरु केली आहे.

(हेही वाचा – ‘लालपरी’ नव्या रंगात! ‘या’ मार्गावर पहिली इलेक्ट्रिक बस)

या नव्या बसेस आताच्या शिवनेरीच्या तुलनेने खूपच अत्याधुनिक व प्रगत प्रणालीचा वापर करून तयार केल्या जात आहेत. तसेच ग्रीनसेल मोबिलिटीने तयार केलेल्या ई-शिवाईच्या तुलनेत अधिक आरामदायक असतील. यामधून प्रवास करताना प्रवाशांना खड्ड्यांतून बस गेल्यास हादरे बसणार नाहीत, याची काळजी घेण्यात आली आहे. ई-शिवनेरी बस आता धावणार असल्याने सध्या डिझेलवर धावत असलेल्या शिवनेरी लवकरच सेवेतून बाद होण्याची शक्यता आहे.

चार्जिंग स्टेशनचे काम सुरु

पुण्याच्या विभाग नियंत्रक कार्यालयाच्या आवारात मोठे चार्जिंग स्टेशन बांधण्याचे काम सुरु आहे. येथे १७ चार्जर असतील. त्यामुळे एकावेळी १७ बस चार्ज केल्या जाणार आहे.

  • ९६ – पुणे विभागाला मिळणार ई-शिवनेरी बस
  • २४ – बस पुणे-दादर
  • २४ – बस पुणे-ठाणे
  • २४ – बस पुणे-परळ
  • २४ – बस पुणे-बोरिवली

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.