तीन वर्षांनी महापालिका शाळांमधील मुलांची सहल; बोरीवली नॅशनल पार्क आणि घाटकोपरचे किडझानियाची निवडली ठिकाणे

234

कोविडनंतर प्रथमच महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची सहल जाणार असून इयत्ता चौथीच्या मुलांची सहल बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तर इयत्ता सातवीच्या मुलांची सहल ही घाटकोपरमधील किडझानिया थीम पार्कमध्ये आयोजित करण्यात आली आहे. ही सहल येत्या काही दिवसांमध्ये आयोजित करून इयत्ता चौथी आणि सातवीच्या मुलांचे मनोरंजन केले जाणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी महानगरपालिका शिक्षण विभागाद्वारे दरवर्षी शैक्षणिक सहली आयोजित करण्यात येतात. मार्च २०२० रोजी कोविड संसर्गाची लाट आल्याने मागील तीन वर्षांमध्ये कोविडच्या निर्बंधामुळे सहली आयोजित करण्यात आली नव्हती. कोविडच्या आधी नोव्हेंबर-डिसेंबर २०१९ मध्ये महापालिका शाळांमधील इयत्ता चौथी ते सातवीच्या मुलांची सहल बोरीवली एस्सेल वर्ल्डमध्ये आयोजित करण्यात आली होती. या एस्सेल वर्ल्डमधील सहलीसाठी प्रती विद्यार्थ्यांमागे ५७५ रुपये खर्च करण्यात आले होते. तर त्या आधीच्या शैक्षणिक वर्षात विरारमधील ग्रेट एस्केप वॉटर पार्कच्या ठिकाणी आणि त्या आधीच्या वर्षी म्हणजे २०१७-१८ मध्ये घाटकोपर येथील किडझिनियाच्या ठिकाणी मुलांची सहल आयोजित करण्यात आली होती.

परंतु कोविडचे निर्बध उठल्यानंतर महापालिका शाळांमधील सहल आयोजित करण्याचा निर्णय मागील महिन्यातील जानेवारी २०२३ मध्ये घेण्यात आला. यामध्ये इयत्ता ४ थीच्या विद्यार्थ्यांसाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (नॅशनल पार्क), बोरीवली येथे तसेच, इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईतील घाटकोपरमधील किड्झानिया थीम पार्क, या स्थळांची निश्चिती करण्यात आली.

(हेही वाचा – मुंबईकरांनो ‘या’ दिवसापासून म्हशीचे दूध महागणार; नवे दर काय? जाणून घ्या)

या सहलीमध्ये इयत्ता चौथीतील ३४ हजार २६७ विद्यार्थी संख्या गृहीत धरण्यात आली आहे. या मुलांची सहल बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जाणार आहे. या सहलीसाठी प्रति विद्यार्थी ५६४ रुपये खर्च केले जाणार असून चौथीतील विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी एकूण १  कोटी ९३ लाख १५ हजार रुपये खर्च केला जाणार आहे.

तर इयत्ता सातवीच्या मुलांची सहल घाटकोपर किडझानिया येथे आयोजित करण्यात आली आहे. या सातवीच्या मुलांची पटसंख्या ३२ हजार ७८८ एवढी असून माध्यमिक शाळांमधील सातवीच्या मुलांची संख्या १२७४ एवढी आहे. त्यामुळे एकूण ३४ हजार ०६२ एवढे मुले या सहलीत भाग घेतील असा अंदाज असून यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांमागे किडझानियामधील सहलीसाठी ६०० रुपये खर्च केला जाणार आहे. त्यामुळे इयत्ता चौथी आणि सातवीच्या सहलीसाठी एकूण ३ कोटी ९७ लाख ५२ हजार रुपये खर्च केले जाणार आहे. या प्रति विद्यार्थी खर्चामध्ये प्रवास खर्च, प्रवेश शुल्क, सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, मिनरल वॉटर, विद्यार्थ्यांकरता अपघात विमा संरक्षण आदींचा समावेश असल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात काय पाहणार

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (नॅशनल पार्क) हे मुंबई शहराच्या सीमांनी वेढलेले आहे. जवळपास १०३.८४ कि. मी. क्षेत्रावर हे उद्यान आहे. मुंबई शहराच्या २० टक्के भूभागावर हे उद्यान वसलेले आहे. या उद्यानात प्रवेश करताच पक्षांचे मधूर स्वर कानी येतात. १७० प्रजातींची फुलपाखरे या उद्यानात मुक्तपणे संचार करताना दिसतात. ब्रिटीश कालीन विहार व तुळशी तलाव हे सुध्दा याच उद्यानात आहेत. या उद्यानात दोन हजार वर्षांपूर्वीच्या बौध्दकालीन लेण्या, कान्हेरी गुंफा आपणास पाहावयास मिळतात. २७४ प्रकारचे पक्षी, ३४ प्रकारचे सस्तन प्राणी तसेच ७८ प्रजातीच्या सरपटणाऱ्या प्राण्यांचा या उद्यानात वावर आहे. मोठे बिबटे, सांबर तसेच, चितळे या उद्यानात आहेत. ऐन, पळस, साग तसेच उक्शी या प्रकारची झाडे या वनात आढळतात. व्याघ्र सफारीद्वारे वाघ व सिंह यांचे दर्शन पर्यटकांना घेता येते. निसर्गाचे संवर्धन करणे हे या उद्यानाचे महत्वाचे उद्दिष्ट आहे.

(हेही वाचा – मुंबईतील बहुचर्चित ४०० किलोमीटर रस्ते सिमेंट काँक्रिटच्या कामांपैकी ५२ किलो मीटर लांबीच्या कामांना रविवारपासून प्रारंभ)

किडझानियांमध्ये काय पाहणार विद्यार्थी

किड्झानिया हे एक सुरक्षित, अद्वितीय आणि परस्पर इनडोअर थीम पार्क आहे. याठिकाणी वास्तविक जीवनातील भूमिका खेळता खेळता मुलांना शिकविणारे एक शहर आहे. प्रत्येक कार्यकृती मुलांना आर्थिक साक्षरता, स्वातंत्र्य आणि वास्तविक जीवनात शिकविण्यासाठी एक अद्वितीय भूमिका अनुभव देते. या थीम पार्कमध्ये ६६ विविध कार्यकृती समाविष्ट आहे. जसे रेडिओ जॉकी बनण्यासाठी कोणते गुण हवे, विमानात प्रवास करताना कशा प्रकारे वागले पाहिजे किंवा कोणत्या गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे? बँकेचे व्यवहार कसे करायचे?, बिस्कीटे अथवा आईस्क्रीम कसे तयार करावयाचे? आग लागल्यास फायर ब्रिग्रेड कार्य कसे करते? अशा विविध गोष्टी विद्यार्थ्यांना शिकण्यास मिळतात. प्रत्यक्ष मिळालेल्या ज्ञानाचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात होतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.