गेल्या काही दिवसात दिग्गज टेक कंपन्यांकडून नोकर कपात केली जात आहे. अशातच आता फूड डिलिव्हरी अॅप्लिकेशन स्विगी कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार असल्याची माहिती मिळत आहे. झोमॅटोनंतर आता आणखी स्विगी ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी कर्मचार्यांना नारळ देण्याच्या तयारीत आहे.
मीडिया अहवालानुसार, डिसेंबर महिन्यात ही स्विगी कंपनी नोकरकपात करण्याची शक्यता आहे. स्विगी सुमारे 250 कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवू शकते, जे एकूण कर्मचाऱ्यांच्या 3 ते 5 टक्के आहे. या नोकरीकपातीमध्ये स्विगीच्या देशभरातील कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आहे. तर स्विगीकडून ग्राहक सेवा विभाग, तंत्रज्ञान आणि उत्पादन विभागात असलेल्या लोकांवर या नोकर कपातीचा परिणाम होणार आहे. स्विगीने नोव्हेंबर महिन्यात दिल्लीतील मोठे किचनही बंद केले आहे. स्विगी निवडक लोकांमध्ये अधिक चोखपणे काम करण्याची योजना आखत आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर कर्मचाऱ्यांना रेटींग्स, बोनस किंवा कामावरून कमी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
(हेही वाचा – पुण्यात बनावट नोटांचा ‘खेळ’! ६ महिन्यांपासून सुरू होती नोटांची छपाई अन्…)
येत्या काही दिवसात स्विगी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना हटवण्यात येणार असून कंपनी सध्या 250 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची शक्यता आहे. पण हा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. कंपन्याना आर्थिक समस्येचा सामना करावा लागत असल्याने कंपनी कर्मचारी कपातीचा निर्णय घेते. स्विगीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीहरी मजेटी यांनी असे सांगितले की, सध्या आर्थिक संकटामध्ये सापडली आहे. या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी कंपनीने कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, फूड डिलिव्हरी करणारी कंपनी स्विगी पूर्वी झोमॅटो कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांना काढले होते.
Join Our WhatsApp Community