राज्यभरात एसटी कर्मचाऱ्याचे आंदोलन अद्याप काही मिटण्याचे संकेत दिसत नाही. राज्य शासनामध्ये एसटी महामंडळाचे विलिनीकरण करा या प्रमुख मागणीवर राज्यातील समस्त एसटी कर्मचारी कायम असून कित्येक आगारातील कर्मचाऱ्यांनी संप कायम सुरूच ठेवला आहे. दरम्यान, आर्थिक परिस्थितीमुळे हतबल एसटी कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील पेठ आगारात आणखी एका चालकाने कमी पगारामुळे आत्महत्या केली आहे.
राहत्या घरी आत्महत्या
नाशिक जिल्ह्यातल्या पेठ आगारातील आणखी एका चालकाने कमी पगारामुळे आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. गहिनीनाथ गायकवाड, असे या कर्मचाऱ्याचे नाव असून गायकवाड यांनी राहत्या घरी आत्महत्या केली आहे. राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी आंदोलन सुरूच ठेवण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर दुसरीकडे लवकरात लवकर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी अद्याप बेमुदत संप सुरूच ठेवणार असल्याची भूमिका घेतली आहे.
(हेही वाचा – देशात समान नागरी कायदा लागू करा, उच्च न्यायालयाची सूचना)
कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना
गेल्या १० ते १२ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १३ आगारातील बसेसची वाहतूक पुर्णपणे ठप्प आहे. हे आंदोलन दडपण्यासाठी प्रशासन संपूर्ण सक्रिय झाले असून त्यांनी रोजंदारीवर काम करणाऱ्या ५१ कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस देखील पाठवली आहे. तर आतापर्यंत ८० हून अधिक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना चोवीस तासांच्या आत कामावर या, अन्यथा कारवाई करू असा इशारा दिला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना वाढली असून, आंदोलन पुन्हा आक्रमक होण्याची शक्याता आहे.