गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले होते. यावेळी त्यांनी भाषणात देशाची माफी मागत तिनही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती. हे कायदे शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच होते, मात्र त्यांना समजावून सांगण्यास आम्ही कमी पडलो, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले. परंतु संसदेत प्रस्ताव मंजूर होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहिल, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती. मात्र अखेर आज तीन कृषी कायदे मागे घेण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळातही मंजूर करून हे कायदे रद्द करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
29 नोव्हेंबरला विधेयक संसदेत सादर होणार
या निर्णयानंतर गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे आजची ही बैठक ऐतिहासिक ठरल्याचे सांगितले जात आहे. यानतंर आता 29 नोव्हेंबर रोजी हे विधेयक संसदेत सादर करण्यात येणार आहे. यावेळी विधेयकाला मंत्रिमंडळात मंजूरी मिळाली संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये तीन कृषी कायदे रद्द करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात येणार आहेत. त्यानंतरच पंतप्रधान मोदी सरकारने लागू केलेले तिनही कृषी कायदे घटनात्मक प्रक्रियेनुसार, रद्द करण्यात येतील. मोदी कॅबिनेट आज या तिनही कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा – एसटीचे सरकारमध्ये विलिनीकरण कठीण! शरद पवारांचे मत )
मी देशवासियांची क्षमा मागतो…
गुरूनानक जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिनही कृषी कायदे मागे घेण्यासंदर्भातील घोषणा केली. यावेळी त्यांनी मी तिनही कृषी कायदे मागे घेतोय, मी देशवासियांची क्षमा मागतो, आमच्या तपस्येत काही कमी राहिली असेल, त्यामुळे काही शेतकऱ्यांना आम्ही या गोष्टी समजावू शकलो नाही. अखेर आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत, असे मोदींनी म्हटले होते.