नगर आग प्रकरणी परिचारिकांचे निलंबन; राज्यव्यापी आंदोलनाचा दिला इशारा

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीत ११ रुग्णांचा मृत्यू झाला. या आगी प्रकरणी रुग्णालयातील परिचारिकांना जबाबदार ठरवून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. याप्रकरणी दोन परिचारिकांचे निलंबन करण्यात आले असून, इतर दोन परिचारिकांना बडतर्फ करून अटक करण्यात आली आहे. या घटनेसंदर्भात दोषी ठरवल्यामुळे महाराष्ट्र परिचारिका संघटनेकडून ‘काळी फित’ आंदोलन करण्यात येत आहे. यात जे. जे. समूह रुग्णालय सहभागी झाले आहे. मात्र ही कारवाई रद्द न झाल्यास बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा या संघटनेकडून देण्यात आला आहे.

तोपर्यंत काळी फित आंदोलन सुरूच

परिचारिकांचा वसा रुग्णसेवेचा असून रुग्णालयातील प्रत्येत घटनेसाठी त्यांना जबाबदार ठरवले जात आहे. नगरमधील अग्नितांडवासाठी इंजिनीअर, इलेक्ट्रिशन या सर्वांना सोडून त्यांना जबाबदार ठरवणे हे कितपत योग्य आहे? असा सवाल महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या उपाध्यक्षा हेमलता गजबे यांनी उपस्थित केला आहे. आमचे काळी फित आंदोलन सुरूच राहील. तसेच, बडतर्फी अथवा निलंबन मागे न घेतल्यास आणि परिचारिकांवरील गुन्हे माफ न केल्यास बेमुदत आंदोलन करण्यात येईल. असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान या संदर्भात विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांनी परिचारिकांची भेट घेऊन सहकार्याचे आश्वासन दिले आहे.

( हेही वाचा : ‘एमपीए’मधील २२ पोलीस प्रशिक्षणार्थींना कोरोनाचा विळखा )

काय आहे प्रकरण ?

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला ६ नोव्हेंबरला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या विभागात एकूण २० रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी ११ जणांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु या प्रकरणासाठी रुग्णसेवेचा वसा घेतलेल्या प्रसंगी स्वत:च्या जीवाची पर्वा न करणाऱ्या परिचारिकांना जबाबदार ठरवण्यात आले आहे. म्हणूनच परिचारिका संघटनेचे राज्यव्यापी काळी फित आंदोलन सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here