अहमदनगर: मुस्लिम मुलीशी लग्न केल्याने, हिंदू तरुणाचे अपहरण करुन खून; आरोपींची कबूली

अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील अपहरण झालेल्या तरुणाचा खून झाल्याचे समोर आले आहे. अटकेत असलेल्या आरोपींनीच खून केल्याची कबुली दिली आहे. दीपक बर्डे असे या तरुणाचे नाव आहे. मुस्लीम तरुणीशी विवाह केल्यानंतर महिनाभराने या तरुणाचे अपहरण झाले होते. मित्रासोबत नोकरी शोधण्यासाठी पुण्यात जातो असे सांगून 30 ऑगस्ट रोजी घराबाहेर पडलेला दीपक बर्डे परतलाच नाही.

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे राहणा-या दीपक बर्डे या आदिवासी भिल्ल समाजाच्या तरुणाचे मुस्लीम मुलीशी प्रेम जुळले होते. या संबंधांना मुलीच्या घरच्यांना मात्र तीव्र विरोध होता. दोघेही सज्ञान असल्याने घरच्यांच्या विरोधात जाऊन दोघांनी महिन्यापूर्वी लग्नगाठ बांधली आणि आयुष्यभरसोबत राहण्याच्या आणाभाकाही घेतल्या. मात्र मुलीच्या घरच्यांनी दीपकला मारहाण आणि दमदाटी करत तिला परत घरी नेले होते. आपली पत्नी पुण्यात तिच्या मामाच्या घरी असल्याचे कळल्यानंतर, 30 ऑगस्ट रोजी दीपकने घरच्यांना आपण मित्रासोबत नोकरी शोधायला पुण्यात जात असल्याचे सांगत पुणे गाठले. परंतु पत्नीला भेटण्याच्या आतच दीपकला मुलीच्या मामाने गाठले आणि त्याला मारहाण करत त्याचे अपहरण केले, असे दीपकच्या सोबत असलेल्या मित्राने सांगितले.

( हेही वाचा: कल्याण- डोंबिवलीत रस्त्यांची दुरवस्था; अनुराग ठाकूर यांनी आयुक्तांना सुनावले खडेबोल )

आरोपींनी खून केल्याची दिली कबूली 

आपला मुलगा बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. वडिलांच्या फिर्यादीनंतर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी सात जणांना अटक केली आहे. आता या आरोपींनी दीपक बर्डेचा खून केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी गोदावरी नदीपात्रात मृतदेह शोधण्यासाठी शोधमोहीम सुरु केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here