रस्ता तिथे एसटी! हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी बसचे ब्रीद वाक्य. या वाक्यानुसार, गावागावात, ग्रामीण भागात एसटी बसेसची सेवा पुरवण्यात एसटी महामंडळ सदैव तत्पर असते. मात्र आदिवासी आणि दुर्गम भाग असलेल्या अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील बससेवा विस्कळीत झाल्याची माहिती समोर येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात अवघ्या ३८ बसेस धावत असून अकोले आगारात केवळ ३८ बसेसच उपलब्ध आहेत.
अकोले तालुक्यातील अकोले आगारात असलेल्या अपुऱ्या बससेवेमुळे अनेक गावांच्या बस फेऱ्या बंद करण्यात आल्या असून विशेष म्हणजे यामध्ये पद्मश्री पुरस्कार प्राप्त असणाऱ्या राहीबाई पोपेरे यांच्या कोंभाळणे या गावाचा देखील समावेश आहे.
(हेही वाचा – तुरुंगातून बाहेर येताच राऊत मोदी, शहा, फडणवीस आणि पवारांना भेटणार; कारणही सांगितले)
जेथे कोणतीच परिवहन व्यवस्था नसते तेथे लालपरी नागरिकांच्या मदतीला धावून येते. इतकेच नाही तर ग्रामीण भागात लालपरी हे दळण-वळणाचे मुख्य साधनही मानले जाते. मात्र कोरोनापूर्वी अकोले आगारात एकूण ६३ बसेस होत्या, ज्या आज केवळ ३८ झाल्या आहेत. त्यामुळे दुर्मग भाग असणाऱ्या अनेक गावात आज बससेवा पूर्णपणे बंद करण्याची वेळ एस.टी. प्रशासनावर आली आहे.
दरम्यान, आता कोरोना महामारी नियंत्रणात असली तरी आजही बस सेवा उपलब्ध नसल्याने अकोले तालुक्यातील गावातील नागरिकांना मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मिळेल त्या वाहनाने या गावातील प्रवास करण्याची वेळ अनेकांवर आली आहे. त्यामुळे सरकारने याची दखल घेत बससेवा सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community