क्रांतिवीरांच्या विचारांतून प्रेरणा घ्यावी; ‘आहुती अनामवीरांची’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात श्याम देशपांडेंचे प्रतिपादन

राष्ट्रीय वाचनालय महाल आणि विजय प्रकाशन नागपूर आयोजित लेखक वीरेंद्र देशपांडे लिखित ‘आहुती अनामवीरांची’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा प्रेस क्लब नागपूर येथे रविवार, २५ डिसेंबर २०२२ रोजी वीरांगना झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचे पणतू विलास तांबे यांच्या हस्ते अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

( हेही वाचा : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात दुर्बिणीतून ग्रहदर्शन करण्याची संधी )

कित्येक मोठमोठे लोक येऊन इतिहास जाणून गेले तरीही झाशीच्या राणीचे जन्मस्थान आजही उपेक्षित आहे, असे राणी लक्ष्मीबाई यांचे पणतू विलास तांबे म्हणाले. १८५७च्या स्वातंत्र्य लढ्याच्या शंभर वर्षानंतर म्हणजे १९५७ला झाशीची राणीच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विलास तांबे यांच्या मातोश्री सुमनताई तांबे यांनी ‘ही बलिदानाची गाथा’ हे पुस्तक भावांजली रुपाने अर्पण केले. हरीराम भूत कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता होते. माजी प्राचार्य आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्यांनी-विचारांनी प्रेरीत असलेले श्याम देशपांडे आपल्या भाषणात म्हणाले की, आपला इतिहास आपणचं जाणून घेत नाही, चुकीचा इतिहास समोर मांडला जातो. कुठल्याही देशाची ओळख ही त्याच्या संस्कृतीवर ठरत असते. आपण हिंदू जर निद्रीस्त राहिलो तर आपली संस्कृती लयास जाईल. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या क्रांतिवीरांनी प्राणाची आहुती दिली त्या क्रांतिवीरांच्या विचारांची, कार्याची नवतरुणांनी प्रेरणा घ्यायला हवी आणि परकीय संस्कृतीचे आक्रमण थोपवायला हवे. असे मार्गदर्शन देशपांडे यांनी उपस्थितांना केले.

राष्ट्रीय वाचनालयाचे अध्यक्ष आणि आयोजक पद्मश्री तांबेकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याचा आढावा घेतला. विजय प्रकाशनचे सचिन उपाध्याय यांनी पुस्तक प्रकाशनामागचा हेतू स्पष्ट केला. लेखक वीरेंद्र देशपांडे म्हणाले, लहानपणापासून क्रांतिकारकांचे चरीत्र, फोटो जमवण्याचा छंद होता. आईने सुध्दा त्यांना त्यांचा छंद जोपासायला मदत केली. आज चार हजार क्रांतिकारकांचा इतिहास त्यांनी अथक परिश्रमाने जपून ठेवला आहे. काही क्रांतिकारकांना आपण ओळखत नाही, त्या अज्ञात क्रांतिकारकांचा इतिहास आपल्याला कळला पाहिजे. अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनान्त…स्तंभ जिथे नां कुणी बांधला पेटली नां वात… या भावनेने बेचैन होऊन ‘आहुती अनामवीरांची’ हे पुस्तक आकारास आले. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय वाचनालय महाल नागपूर येथे पितृ पंधरवड्यात अज्ञात क्रांतिकारकांचे पिंडदान देऊन श्राद्ध केले तेव्हा ही संकल्पना मनात रूजली त्याचवेळी या पुस्तकाचे स्वरूप तयार झाले, असेही देशपांडे म्हणाले. मंचावरील मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल देव, तर मान्यवरांचा परिचय माधुरी तिवारी यांनी करून दिला. कार्यक्रमाला राष्ट्रीय वाचनालयाचे सचिव चंद्रशेखर तिवारी आणि अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here