नागपूरचे एम्स एनएबीएच मान्यता प्राप्त करणारे देशातील प्रथम रुग्णालय ठरले; प्रधानमंत्री मोदींनी केले अभिनंदन

195
नागपूरचे एम्स एनएबीएच मान्यता प्राप्त करणारे देशातील प्रथम रुग्णालय ठरले; प्रधानमंत्री मोदींनी केले अभिनंदन
नागपूरचे एम्स एनएबीएच मान्यता प्राप्त करणारे देशातील प्रथम रुग्णालय ठरले; प्रधानमंत्री मोदींनी केले अभिनंदन

नागपूरातील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) हे देशातील नॅशनल अ‍ॅक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (एनएबीएच) चे मानाकंन प्राप्त करणारे प्रथम रुग्णालय ठरले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एम्स नागपूरच्या चमूचे अभिनंदन केले.

एनएबीएच मान्यता प्राप्त करणारे नागपूरातील एम्स हे प्रथम ठरले असल्याने आरोग्य क्षेत्राकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ही या रुग्णालयासाठी महत्वाची पावती असून उच्च दर्जाची रुग्ण सेवा आणि सुरक्षितता प्रदान करण्याच्या रुग्णालयाच्या वचनबद्धतेचा हा दाखला आहे. एनएबीएच मान्यता हे आरोग्यसेवेच्या गुणवत्तेसाठी जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त मानांकन आहे. एनएबीएचची मान्यता मिळणे हा कुठल्याही रुग्णालयासाठी मोठा मान समजला जातो.

एनएबीएचची मान्यता प्रक्रिया कठोर आणि सर्वसमावेशक असते. यामध्ये रुग्णांची काळजी, सुरक्षितता आणि संस्थात्मक कार्यक्षमतेसह अनेक क्षेत्रांमध्ये रुग्णालयाच्या कामगिरीचे मुल्यांकन केले जाते. एम्स नागपूर या सर्व मापदंडामध्ये उत्कृष्टतेची वचनबद्धता दाखवून ही मान्यता मिळविली आहे. एम्स नागपूरने एनएबीएचची मान्यता मिळवून आरोग्य क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. यामुळे या रुग्णालयालाकडे रुग्णांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलेले आणि आरोग्य सेवांचा अग्रगण्य प्रदाता म्हणून त्याची प्रतिष्ठा सुधारण्यास अधिक मदत होईल. एनएबीएचची मान्यता मिळविण्यामागे एम्सच्या कर्मचाऱ्यांचे कठोर परिश्रम व समर्पण आहे.

(हेही वाचा – केंद्र सरकार एनटीसी गिरणी कामगारांच्या पाठीशी, सर्व मागण्या तातडीने करणार पूर्ण – पियुष गोयल)

एम्स नागपूरबाबतचे ट्विट सामायिक करीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयाचे अभिनंदन केले. ते म्हणाले, ‘या कामगिरीबद्दल एम्स नागपूरच्या चमूचे अभिनंदन, ही कामगिरी करत दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्याचा एक मापदंड स्थापित केला आहे.’ प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते या रुग्णालयाचे लोकार्पण डिसेंबर २०२२मध्ये झाले होते.

नॅशनल अ‍ॅक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (NABH) ही भारतीय गुणवत्ता परिषदेचे एक घटक आहे. याची स्थापना आरोग्य सेवा संस्थांसाठी मान्यता प्रदान करणे व संचाल‍ित करणे यासाठी करण्यात आली आहे. रुग्णांच्या अपेक्षित गरजा पूर्ण करणे आणि आरोग्य क्षेत्रातील प्रगतीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानदंड स्थापन करणे अशी मंडळाची रचना आहे. एनएबीएच मंडळाचे कार्य स्वायत्त आहे. आरोग्य सुविधांची मान्यतेसह ही संस्था उत्कृष्ट परिचारिका घडविण्यास प्रोत्साहन देत असते. प्रयोगशाळा प्रमाणन उपक्रम राबविते, गुणवत्ता आणि रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यशाळा, व्याख्याने आयोजित करीत असते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.