हुश्श! वाळूचे धूलिकण गायब, तरीही हवेचा दर्जा ढासळलेलाच…

136

तब्बल तीन दिवसानंतर थंडीसह थेट पाकिस्तान आणि इराणमधून गुजरात आणि उत्तर कोकणात दाखल झालेले धूलिकण मंगळवारी मुंबईतून नाहीसे झाले. या वाळूच्या धूलिकणांनी मुंबईचे वातावरण पूर्णतः खराब करून ठेवले होते. थंडीच्या कडाक्यात सूक्ष्म धूलिकणांमुळे मुंबईतील हवेचा दर्जा धोकादायक असल्याचे ‘सफर’ या मुंबई वेधशाळा आणि पुण्यातील आयआयटीएमच्यावतीने सुरु असलेल्या प्रणालीतून जाहीर करण्यात आले. वाळूच्या कणांमुळे दृष्यमानताच कमी झाल्याने प्रवासात दूरच्या ठिकाणाची नेमकी स्थिती समजण्यात मुंबईकरांना अडचणी येत होत्या.

(हेही वाचा – राज्यात सलग तिस-या दिवशीही गारठा कायम; केंद्रीय वेधशाळेने दिला इशारा)

हवेची गुणवत्ता अतिधोकादायक

रविवारपासूनच द्रूतगती मार्ग, रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून दूरच्या ठिकाणाचे दृश्य गायबच झाले होते. सोमवारी तर हवेची गुणवत्ता अतिधोकादायक बनली होती. मुंबईतील हवेचा दर्जा चक्क ५०० च्याही पुढे गेला. देशभरातील सर्वात खराब हवा मुंबईत आढळून येत असल्याची माहिती सफरच्यावतीने दिली जात होती. मात्र मंगळवारी सकाळी हवेची गुणवत्ता ३८७ पर्यंत खाली सरकली. तरीही मुंबई धोकादायक पातळीवरच असल्याचे ‘सफर’च्यावतीने सांगण्यात आले. मुंबईतील एकूण हवेच्या दर्जाच्या तुलनेत सकाळच्या प्रहारात विविध ठिकाणच्या हवेची दर्जा खूपच जास्त ढासळली होती. माझगावात सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण चक्क ५३२ पर्यंत पोहोचले. कुलाब्यात सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण ४९७ तर मालाडमध्येही सूक्ष्म धूलिकणांची मात्रा ४५३ नोंदवली गेली. संपूर्ण मुंबईभरात सर्वात जास्त धोकादायक कुलाबा आणि बोरिवली आढळून आले. दोन्ही ठिकाणी सूक्ष्म धूलिकणांसह, धूलिकणांचीही मात्रा चारशेच्या घरात पोहोचली. कुलाब्यात धूलिकण ५१३ तर सूक्ष्म धूलिकण ४९७ पर्यंत तर बोरिवलीत धूलिकण ४५१ तर सूक्ष्म धूलिकण ४१४ पर्यंत पोहोचली.

मुंबईतील विविध ठिकाणांचा हवेचा दर्जा

ठिकाण – धूलिकण (पीएम १०) – सूक्ष्म धूलिकण (पीएम २.५)
बोरिवली – ४५१ – ४१४
मालाड – ३२१ – ४५३
भांडुप – ३७५ – ३८२
अंधेरी – ४२६ – ३८२
चेंबूर – ४१६ – ३९२
वरळी – २४५ – ३४९
माझगाव – ३९१ – ५३२
कुलाबा – ५१३ – ४९७

आरोग्याची काळजी घेताना 

  • अतिधोकादायक ठिकाणी शक्यतो प्रवास करणे टाळा. दमेकरी रुग्णांनी सोबत औषध ठेवा. मोठ्या अंतराचा पायी प्रवास हळूहळू पार करावा. सर्दी, खोकला किंवा श्वसनाचा त्रास उद्भवल्यास तातडीने डॉक्टरांच्या दवाखान्यात जा.
  • धोकादायक ठिकाणीही भल्या पहाटेची तसेच रात्रीची भ्रमंती टाळा. हवेच्या संपर्कात असताना अतिताणाची कामे करु नका. सर्दी, खोकला किंवा श्वसनाचा त्रास उद्भवल्यास तातडीने डॉक्टरांच्या दवाखान्यात जा.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.