अजित पवारांची साथ, क्षणिक की दीर्घकाळ?

216
अजित पवारांची साथ, क्षणिक की दीर्घकाळ?

जयेश शत्रुघ्न मेस्त्री

अजित पवारांनी उठाव करून चाय बिस्कुट पत्रकारांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. मात्र शरद पवारांनी भाकरी फिरवल्यानंतर अजित पवार नाराज झालेत हे सांगण्यासाठी कुण्या ज्योतिष्याची गरज आहे काय? अजित पवार यांच्यावर अन्याय झाला आणि कधी ना कधी त्यांना उठाव करण्याची गरज लागणार होती. फक्त वेळ कोणती एवढाच प्रश्न होता.

आता अजित पवारांनी वेळ साधली आहे आणि शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी देखील फुटीरतेच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. अजित पवारांनी जे केलं त्यास पोयटीकल जस्टीस म्हणता येईल. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे 50 वर्षांचे राजकरण पाहता ही वेळ कधी ना कधी येणारच होती. आज अनेकांना नैतिकता आठवली असली तरी या राजकारणाचा पाया स्वतः शरद पवारांनी रचला होता. त्यामुळे अजित पवार, एकनाथ शिंदे किंवा फडणविसांना याबाबतीत दोषी ठरवता येणार नाही. ज्यांना नैतिकतेचा साक्षात्कार झाला आहे त्यांनी महाविकास आघाडीच्या स्थापनेच्या घटनेचे स्मरण करायला हरकत नाही.

दुसरी गोष्ट ज्या भाजपा समर्थकांना दुःख झाले आहे, त्यांनी सत्तेपासून दूर असल्याचे दिवस आठवावेत. सत्तेविण शहाणपण नाही हे लक्षात ठेवावे. आता मुद्दा असा की अजित दादांचा हा उठाव यशस्वी होईल की मध्ये गंडेल? हा उठाव किती काळ टिकतो यापेक्षा शरद पवारांना त्यांच्या पुतण्याने मात दिली आणि भांडणं चव्हाट्यावर आली हे अधिक महत्त्वाचे आहे. हा उठाव फसला तरी पुढे असे उठाव होत राहतील आणि राष्ट्रवादी पक्ष एकसंध राहणार नाही. ही आग सहजासहजी विझणार नाही.

(हेही वाचा – पक्षावरील दावा सिद्ध करण्यासाठी अजित पवारांना करावा लागणार संघर्ष; शरद पवारांनी आधीच…)

आता महत्वाचा मुद्दा असा की अजित दादा आणि भाजपाची युती दीर्घकाळ टिकेल का? तर याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. मोदी, शहा आणि फडणवीसांनी वरवर युती केली असली तरी राजकीय दृष्टिकोनातून यास युती म्हणता येणार नाही तर यास ‘पाठींबा’ आणि ‘संरक्षण’ म्हटले जावे. कारण महाराष्ट्रातल्या बड्या नेत्याच्या विरोधात उठाव करायचा असेल तर बड्या पक्षाच्या पाठींब्याची आणि संरक्षणाची गरज आहे. केवळ उठाव केला असता, एक गट वेगळा झाला असता तर पुढे काय करायचं, हा प्रश्न उरला असता आणि पवारांनी हा उठाव तात्पुरता का होईना पण मोडून काढला असता. म्हणून 2024 पर्यंत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुरक्षा पुरवण्यासाठी ही तात्पुरती युती केली आहे.

मंत्रिमंडळात सामील केल्याने यांच्या मागे भारतातला सर्वात मोठा पक्ष आहे याची खात्री पटते आणि आलेले परत जाण्याची शक्यता कमी होते. म्हणून ही युती करण्यात आली आहे.

अजित पवार हे तसे सौम्य उजवेविरोधी म्हणता येतील. त्यांनी कधीही प्रखर हिंदूविरोधी भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात जे ब्राह्मणविरोधी, जातीयवादी व हिंदूविरोधो जे वातावरण निर्माण झालंय, त्याचा प्रभाव कमी होईल. त्यामुळे या युतीमुळे हिंदू भावविश्वाला धक्का लागणार नाही. ही युती क्षणिक असली तरी, 2024 ला कदाचित अजित दादा भाजपच्या विरोधात लढतील तरी हिंदुत्वाच्या राजकारणाच्या दृष्टीने याचा प्रभाव काही काळ नक्कीच टिकून राहील.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.