सोलापूर-अक्कलकोट मार्गावर भीषण अपघात; ५ जागीच ठार तर १२ जखमी

114

सोलापूर-अक्कलकोट मार्गावर भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. कुंभारी गावा जवळ अक्कलकोट येथून प्रवाशी भरून सोलापूरकडून येणाऱ्या जीपचा हा अपघात घडला आहे. यामध्ये दोन महिलांसह एकूण पाच प्रवाशी जागीच ठार झाले आहे. आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला असून या अपघातामध्ये १२ प्रवासी जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

(हेही वाचा- आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार! नारायण राणेंचा हल्लाबोल)

प्राथमिक माहितीनुसार, जीपचे टायर फुटल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातातील मृत आणि जखमींची ओळख पटविण्याचे काम सोलापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत. जखमींवर सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

असा घडला अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, अक्कलकोट येथून एमएच १३ एएक्स १२३७ या क्रमांकाची प्रवासी वाहतूक करणारी जीप प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन सोलापूरकडे येत होती. परंतु सोलापूरच्या अलीकडे कुंभारी येथे भरधाव जीपचे पुढचे चाकाचे टायर फुटले आणि जीप उलटली. यामुळे जीपमधील अनेक प्रवासी बाहेर फेकले गेले. यामध्ये पाच प्रवाशांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मृत आणि जखमींमध्ये सोलापूर, पुणे आणि मुंबईच्या प्रवाशांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. अपघातातील जखमींवर जवळलील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त लोकांची अद्याप ओळख पटलेली नाही. कुंभारी गावातील स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा परिसर अपघातप्रवण क्षेत्र झाला असल्याने दुचाकीचे कित्येक अपघात झाले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.