Akshaya Tritiya 2022: जाणून घ्या, अक्षय्य तृतीयेचे महत्त्व

162

साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय (अक्षय्य) तृतीयेला तिलतर्पण करणे, उदकुंभदान करणे, मृत्तिका पूजन करणे, तसेच दान देण्याचा प्रघात आहे. ‘मदनरत्न’ या पुरातन संस्कृत ग्रंथातील संदर्भानुसार ‘अक्षय्य तृतीया हा कृतयुगाचा किंवा त्रेतायुगाचा प्रारंभदिन आहे. या तिथीला हयग्रीव अवतार, नरनारायण प्रकटीकरण आणि परशुराम अवतार झाला. या तिथीला ब्रह्मा आणि श्रीविष्णु यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्त्विकता १० टक्क्यांनी वाढते. या कालमाहात्म्यामुळे या तिथीस पवित्र स्नान, दान यांसारखी धर्मकृत्ये केल्यास त्यांच्यामुळे आध्यात्मिक लाभ होतो. या तिथीस देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते’. सनातन संस्थेद्वारा संकलित लेखातून अक्षय तृतीयेचे महत्त्व आणि अध्यात्मशास्त्र आपण समजून घेऊया.

महत्त्व

अस्यां तिथौ क्षयमुपैति हुतं न दत्तं

तेनाक्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया ।

उद्दिश्य दैवतपितॄन्क्रियते मनुष्यैः

तच्चाक्षयं भवति भारत सर्वमेव ।। – मदनरत्न

(हेही वाचा – केंद्र सरकार देतंय नवीन आधारकार्ड, कोणासाठी आहे? वाचा)

अर्थ :

(श्रीकृष्ण म्हणतो) हे युधिष्ठिरा, या तिथीस केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही; म्हणून हिला मुनींनी ‘अक्षय तृतीया’ असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते.

‘साडेतीन मुहुर्तांतील एक मुहूर्त’ मानले जाणे – अक्षय (अक्षय्य) तृतीया साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला. या दिवसाने एका कलहकालाचा अंत आणि दुसऱ्या युगाच्या सत्ययुगाचा प्रारंभ, अशी संधी साधलेली असल्यामुळे अक्षय (अक्षय्य) तृतीया या संपूर्ण दिवसाला ‘मुहूर्त’ म्हणतात. मुहूर्त केवळ एका क्षणाने साधलेला असला, तरी संधीकालामुळे त्याचा परिणाम २४ तासांपर्यंत कार्यरत असल्याने तो संपूर्ण दिवस शुभ मानला जातो; म्हणूनच (अक्षय्य) तृतीया या दिवसाला ‘साडेतीन मुहुर्तांतील एक मुहूर्त’ मानले जाते. अक्षय (अक्षय्य) तृतीया या तिथीवरच हयग्रीव अवतार, नरनारायण प्रकटीकरण आणि परशुराम अवतार झाला. यावरून अक्षय तृतीया या तिथीचे महत्त्व लक्षात येते.

अक्षय तृतीया हा सण साजरा करण्याची पद्धत 

‘कालविभागाचा कोणताही प्रारंभदिवस भारतियांना नेहमीच पवित्र वाटतो; म्हणून अशा तिथीस स्नानदानादी धर्मकृत्ये सांगितली गेली आहेत.

या दिवसाचा विधी असा आहे – पवित्र जलात स्नान, श्रीविष्णूची पूजा, जप, होम, दान आणि पितृतर्पण. या दिवशी अपिंडक श्राद्ध करावे आणि ते जमत नसेल, तर निदान तिलतर्पण तरी करावे.

धर्मकृत्यांचा अधिक लाभ होणे – या तिथीला विष्णुपूजा, जप, होमहवन, दान आदी धर्मकृत्ये केल्यास अधिक आध्यात्मिक लाभ होतो असे मानले जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सातत्याने सुख-समृद्धी प्राप्त करून देणार्या देवतेची कृतज्ञतेचा भाव ठेवून उपासना केल्यास आपल्यावर होणार्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, असे मानले जाते. श्रीविष्णुसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून भक्तीभावाने पूजन करावे. होमहवन आणि जपजाप्य करण्यात काळ व्यतीत करावा.

मृत्तिका पूजन – सदोदित कृपादृष्टी ठेवणार्या मृत्तिकेमुळेच आपल्याला धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी आणि वैभवलक्ष्मी यांची प्राप्ती होते. अक्षय तृतीया हा दिवस म्हणजे कृतज्ञता भाव ठेवून मृत्तिकेची उपासना करण्याचा दिवस.

मातीत आळी घालणे आणि पेरणी – गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे अक्षय (अक्षय्य) तृतीया या दिवसापर्यंत मशागत करण्याचे काम पूर्ण करावे. अक्षय तृतीयेच्या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मृत्तिकेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून पूजन करावे. त्यानंतर पूजन केलेल्या मृत्तिकेमध्ये आळी घालावीत आणि त्या आळ्यांमध्ये बियाणे पेरावे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास प्रारंभ केल्यास त्या बियाण्यांपासून विपुल धान्य पिकते आणि बियाण्याचा कधीही तुटवडा होत नाही. त्यामुळे वैभव प्राप्त होते.

वृक्षारोपण – अक्षय तृतीया या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात, तसेच आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही.

हळदीकुंक – स्त्रियांसाठी अक्षय तृतीया हा दिवस महत्त्वाचा असतो. चैत्रात बसवलेल्या चैत्रगौरीचे या दिवशी त्यांना विसर्जन करायचे असते. त्यानिमित्त त्या हळदीकुंकूही करतात.

अक्षय तृतीयेला करावयाच्या दानाचे महत्त्व 

अक्षय (अक्षय्य) तृतीयेला केलेले दान कधीही क्षयाला जात नाही. सत्पात्रे दान करणे, हे प्रत्येक मनुष्याचे परम कर्तव्य आहे’, असे हिंदु धर्म सांगतो. सत्पात्रे दान म्हणजे सत्च्या कार्यार्थ दानधर्म करणे ! दान केल्याने मनुष्याचे पुण्यबळ वाढते, तर ‘सत्पात्रे दान’ केल्यामुळे पुण्यसंचयासह व्यक्तीला आध्यात्मिक लाभही होतो. येथे सत्पात्रे दान, म्हणजे जेथे अध्यात्मप्रसारासमवेत राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य केले जाते, अशा सत्च्या कार्यात दान करणे. संत, धार्मिक कार्य करणार्या व्यक्ती, धर्मप्रसार करणार्या आध्यात्मिक संस्था, धर्माविषयीचे उपक्रम आदींना वस्तू वा द्रव्य रूपाने दान करणे हे काळानुरुप सत्पात्रे दानच आहे. तसेच धर्माविषयीच्या उपक्रमांत सहभागी होणे, हे तनाचे दान होय, यासाठी देवतांचे विडंबन, धार्मिक उत्सवांतील अपप्रकार इत्यादी रोखावे. कुलदेवतेचा जप करणे, तिला प्रार्थना करणे यांद्वारे मन अर्पण (दान) करावे.

संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.