पुढील आठवड्यात बंगालच्या उपसागरात ‘असनी’ चक्रीवादळ घोंघावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे सतर्कतेबरोबरच मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नैऋत्य हिंदी महासागरावरील कमी दाबाचे क्षेत्र मंगळवारी तयार झाले असून शनिवारपर्यंत ते पूर्व-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे.
हे वादळ उत्तर आणि ईशान्येकडे सरकणार
पुढील आठवड्याच्या सुरुवातीला २१ मार्च रोजी चक्रीवादळात बदलण्याची दाट शक्यता आहे, तर २२ मार्च रोजी हे वादळ उत्तर आणि ईशान्येकडे सरकेल. उत्तर आणि उत्तर-पूर्व दिशांना प्रभाव दाखवल्यानंतर हे चक्रीवादळ २३ मार्च रोजी बांगलादेश आणि म्यानमारच्या उत्तरेकडील टोकापर्यंत पोहोचेल. यानंतर हे वादळ अंदमान आणि निकोबार बेटांकडे जाईल. जर या चक्रीवादळाने रौद्र रूप धारण केले, तर त्याचे नाव ‘असनी’ असेल. नियमांनुसार श्रीलंकेने या चक्रीवादळाला हे नाव दिले आहे. सध्या समुद्राची स्थिती मध्यम ते उग्र आहे. मात्र शुक्रवार, १८ मार्चपासून ती अत्यंत उग्र होण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – ‘द काश्मीर फाईल्स’ बाबत ममता बॅनर्जी बरळल्या, म्हणाल्या…)
हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा
या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिलाय. येत्या बुधवारी बंगालचा दक्षिणेकडील भाग आणि अंदमान समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. शनिवार ते मंगळवार दरम्यान अंदमान समुद्रातून अंदमान-निकोबार बेटांवर प्रवास न करण्याचा सल्लाही दिला आहे. तसेच रविवारी अंदमान आणि निकोबार बेटांवर जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. या दिवशी वाऱ्याचा वेग ताशी ७० ते ८० किलोमीटर असू शकतो, तर दुसऱ्या दिवशी ताशी ९० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. मात्र, चक्रीवादळाचे वादळात रुपांतर झाल्यास ते किती धोकादायक ठरू शकते, याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला नाही.