बेस्ट उपक्रमाने एक फलक लावत प्रतिक्षा नगर आगारामधील सर्व वाहक-चालकांची बदली आणिक आगारात झालेली आहे, अशी माहिती कर्मचाऱ्यांना दिली. प्रतिक्षा नगर आगारातील केवळ लॉकर वापरावे, हजेरी मात्र आणिक आगारात लावली जाईल, अशा आशयाचा फलक लावण्यात आलेला आहे. त्यामुळे अनेकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. परंतु प्रतिक्षा नगर आगाराची जागा खाली करण्याचे नक्की कारण काय, याचे सखोल विश्लेषण बेस्टच्या तज्ज्ञ अभ्यासकांनी केले आहे. जाणून घेऊया या व्हायरल फलकाचे सत्य…
भाडेतत्वावरील बस गाड्यांना जागा
बेस्टच्या स्वमालकीच्या बस हळूहळू कमी होत चालल्या आहेत. प्रत्येक बसची साधारण १५ वर्षांची लाईफ असते. त्यानंतर संबंधित बसची गणना स्क्रॅपिंगमध्ये केली जाते. खराब झालेल्या बस नंतर भंगारात काढल्या जातात. त्यामुळे गेल्या काही वर्षात बेस्ट उपक्रमाने नव्या बस खरेदी न करता भाडेतत्वावरील बस घेण्याचे धोरण अवलंबले आहे. असे बेस्टच्या वरिष्ठ अभ्यासकांनी हिंदुस्थान पोस्टशी बोलताना स्पष्ट केले आहे. ज्या भाडेतत्वावरच्या बस आहेत त्यांना लागणारा सर्व खर्च, इन्फ्रास्ट्रक्चर सामान बेस्ट प्रशासनामार्फत पुरवले जाणार आहे. अलिकडे मुंबईत सर्व भाडेतत्वावरील बसेस येऊ लागल्या आहेत, त्यामुळे या बस कुठे जागा द्यायची, असा प्रश्न निर्माण झाला होता.
( हेही वाचा : “बेस्ट”ची बेस्ट सुविधा, एक कार्ड सर्वत्र प्रवास! वाचा काय आहे योजना? )
चालक-वाहकांची बदली
सध्या बेस्ट प्रशासनाकडे सीएनजी (CNG) च्या अनेक बस आहेत. प्रतिक्षा डेपोमध्ये प्रामुख्याने डिझेलवर चालणाऱ्या बसेस उभ्या केल्या जातात. त्यामुळे हा डेपो हळूहळू रिकामा होत आहे. यामुळेच प्रतिक्षा डेपोचे काही प्रमाणात नुतनीकरण करुन भाडेतत्वावरील बसेस याठिकाणी उभ्या केल्या जाणार आहेत. असे बेस्ट अभ्यासकांनी स्पष्ट केले. यापूर्वी बेस्ट प्रशासनाकडून विद्युत पुरवठा विभागात वीजेचे दर ठरवले जात होते. परंतु अलिकडच्या काळात हे वीजेचे दर ठरवण्याचे संपूर्ण अधिकार महाराष्ट्र शासनाने, विद्युत नियमक आयोगाला दिले आहेत. यामुळे बेस्टची तूट/ तोटा भरून निघत नाही. असेही त्यांनी सांगितले. परिणामी बेस्टने भाडेतत्वावर बस घेण्याचा निर्णय घेतला. यासाठीच १४ फेब्रुवारीपासून प्रतिक्षा डेपोच्या सर्व चालक-वाहकांची बदली आणिक आगारामध्ये करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community