नायगाव ‘बीडीडी’मधील २०६ गाळेधारकांची पुनर्वसित इमारतींमध्ये सदनिका निश्चिती

म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत उभारण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये पात्र गाळेधारकांना वितरित करावयाच्या २०६ सदनिकांची संगणकीय प्रणालीद्वारे निश्चिती मंगळवारी करण्यात आली.

( हेही वाचा : संजय राऊत किती कोटींचे मालक? )

वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार कालिदास कोळंबकर, उच्चस्तरीय देखरेख समितीचे सदस्य जॉनी जोसेफ, राज्य सूचना व विज्ञान अधिकारी मोईज हुसैन अली, बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे संचालक सतीश आंबावडे, उपमुख्य अधिकारी (पणन) राजेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत नायगाव येथील पोलीस विभागाच्या अखत्यारीतील इमारत क्रमांक २ ब, ३ ब व ४ ब मधील गाळेधारकांना पूनर्विकासाअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या पूनर्वसन इमारतींमध्ये मालकी हक्काने मिळणाऱ्या सदनिकांचा क्रमांक यादृच्छिक पद्धतीने संगणकीय प्रणालीद्वारे निश्चित करण्यात आला. सदनिका निश्चितीसाठी म्हाडातर्फे संगणकीय आज्ञावली तयार करण्यात आली.

२३८ पैकी २०६ ठरले पात्र

  • नायगाव बीडीडी चाळीतील इमारत क्रमांक २ ब, ३ ब व ४ ब या पोलीस विभागाच्या अखत्यारीत आहेत. या तीन इमारतींमध्ये एकूण २३८ निवासी व २ अनिवासी गाळे/सदनिका आहेत. या २३८ पैकी २०६ पात्र गाळेधारकांची यादी मुंबई पोलीस आयुक्तांनी ‘म्हाडा’च्या मुंबई मंडळाकडे दिली आहे.
  • या यादीतील २०६ गाळेधारकांना पुनर्विकास प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या पुनर्वसन इमारतीचा क्रमांक, इमारतीतील सदनिकेचा मजला, सदनिकेचा क्रमांक याची निश्चिती मंगळवारी करण्यात आली.
  • या गाळेधारकांना म्हाडातर्फे तात्पुरत्या निवाऱ्यासाठी संक्रमण गाळ्यांची व्यवस्था केली जाणार आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा नागरी पुनरुत्थान प्रकल्प असून, त्याची जबाबदारी शासनाने म्हाडाकडे सोपविली आहे.
  • प्रस्तावित पुनर्वसन इमारतींत सदनिका निश्चित करण्यात आलेल्या भाडेकरू/ रहिवाशांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here